समन्वय समिती सभेत निर्णय
चंद्रपूर ४ मार्च – गेल्या महिनाभरापासून चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र, ती गती आणि लसीकरणाची संख्या वाढवण्यासाठी लसीकरण केंद्रे वाढविण्यात येणार असल्याचे मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी ३ मार्च रोजी मनपा सभागृहात झालेल्या समन्वय समिती सभा बैठकीत सांगितले.
कोरोना लसीकरणाची मोहीम ही आतापर्यंत झालेल्या लसीकरण मोहिमेंच्या तुलनेत मोठी आहे. चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत ३ लसीकरण केंद्रांद्वारे लसीकरण केले जात आहे. प्रत्येक केंद्रावर दरदिवशी किमान १०० लसीकरण केले जात आहेत. यात गती आणण्याच्या दृष्टीने आता बंगाली कॅम्प भागातही लसीकरण केंद्र सुरु करण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स पाठोपाठ आता ४५ वर्षावरील कोमॉर्बिड रुग्णांना व ६० वर्षे वयावरील नागरीकांना लस देण्यात येत आहे. ४५ वर्षावरील प्रत्येक नागरीकाला सध्या लस देण्यात येणार नसुन कोमॉर्बिड रुग्णांचाच यात समावेश आहे. या आजारांची सुची शासनामार्फत देण्यात आलेली आहे. लसीकरण नोंदणीसाठी केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार ‘को-विन’ अॅपचा वापर बंधनकारक आहे.
पावर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे मुख्य वैद्यकीय अधिकारी श्री. आविष्कार खंडारे यांनी यांनी कोरोना काळात करीत असलेल्या उपाययोजना तसेच केल्या जाणाऱ्या नियोजनाची माहिती दिली. गेल्या काही दिवसात कोरोनो रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरवात झालेली आहे. सध्या मनपा हद्दीत ८८१५ केसेस असुन ११७ मृत्यू तर १०२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा काळजीपूर्वक तयारी ठेवणे गरजेचे आहे. यात चाचण्यांची संख्या वाढविणे, हाय रिस्क – लो रिस्क रुग्ण ओळखणे व त्यांची चाचणी करणे, घरोघरी तपासणी करणे, कंटेनमेंट झोनची तयारी ठेवणे, बेड्सची उपलब्धता ठेवणे या सर्व बाबींची तयारी ठेवणे गरजेचे आहे. दुकानदार, भाजी, फळ विक्रेते आणि असे लोक ज्यांचा इतर लोकांशी दररोजचा संपर्क येतो त्यांची चाचणी करणे, आयएलआय – सारीचे रुग्ण या सर्वांची दर १५ दिवसांनी चाचणी होणे गरजेचे आहे. हाय रीस्क असलेल्या प्रभागात मोबाईल अँटीजन व्हॅनच्या माध्यमातुन मोठया प्रमाणावर चाचणी करून दडलेले रुग्णांना शोधुन काढता येणार आहे. या काळात लोकप्रतिनिधींची भुमिका महत्वाची आहे त्यांच्या माध्यमातून नागरीकांना चाचणीसाठी प्रवृत्त करता येईल. तसेच होम आयसोलेशन रुग्णांवर लक्ष ठेवण्यात व त्यांनी आयसोलेशन नियमांचे पालन करावे याकरीता लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे.
याप्रसंगी मा. उपमहापौर श्री. राहुल पावडे. स्थायी समिती सभापती श्री. रवी आसवानी, मा. आयुक्त श्री. राजेश मोहिते, नगरसेवक, नगरसेवीका, मा. उपायुक्त श्री.विशाल वाघ, श्री.अशोक गराटे, सहायक आयुक्त शीतल वाकडे, विद्या पाटील शहर अभियंता श्री. महेश बारई तसेच महानगरपालिका अधिकारी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व पोलीस विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.