15 मे पर्यंत कडक निर्बंध…उद्या होणार घोषणा
– मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई-
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 30 एप्रिलपर्यंत लागू असलेले टाळेबंदीसदृश्य कडक निर्बंध आणखी 15 दिवसांसाठी वाढविण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतची औपचारिक घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या शुक्रवारी करणार आहेत.
राज्यात कडक निर्बंध असतानाही कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढत असल्याने, निर्बंधांचा कालावधी आणखी 15 दिवसांनी वाढविण्यात यावा, अशी भूमिका महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सातत्याने घेतली आहे. आजच्या बैठकीतही या पक्षांच्या वरिष्ठ मंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. निर्बंधांची मुदत वाढविल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो, असे मत मंत्र्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर पत्रपरिषदेत दिली.
राज्यात लागू असलेल्या कडक निर्बंधांचे काही प्रमाणात सकारात्मक परिणामही दिसून आले आहेत. मागील दोन-तीन दिवसांच्या काळात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. केवळ निर्बंध लादून फार जास्त फरक होणार नाही. नागरिकांनी देखील मुखाच्छादन आणि भौतिक दूरता या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अनावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणार नाही, असा निर्धारच लोकांनी करायला हवा, तरच कडक निर्बंधांची मुदत वाढविण्याचे चांगले परिणाम दिसतील राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. कडक निर्बंधांची मुदत वाढविण्याच्या मुद्यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आज कुठलाही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, अन्य मंत्र्यांच्या मतांशी मुख्यमंत्री सहमत झाले. सध्या निर्बंधांची मुदत 30 एप्रिलपर्यंत असल्याने, त्याच दिवशी वाढीव मुदतीची घोषणा मुख्यमंत्री स्वत: करणार आहेत. निर्बंधांना मुदतवाढ देण्याचे जवळजवळ ठरले आहे. ही मुदतवाढ 15 दिवसांची असू शकते किंवा 10 दिवसांचीही असू शकते, असे टोपे यांनी सांगितले.
सध्याचेच नियम कायम राहणार
या वाढीव निर्बंधांच्या काळातही सध्या लागू असलेले सर्वच नियम कायम राहणार आहेत. जिल्हा आणि शहरबंदी लागू राहील. नागरिकांच्या विनाकारण घराबाहेर पडण्यावरही निर्बंध राहतील तसेच कार्यालयांमध्ये मर्यादित लोकांच्याच उपस्थितीत काम होईल. किराणा दुकाने, दही व दुधाच्या विक्रीची दुकाने आणि इतर आवश्यक सेवा देणार्या दुकांनाकरिता आज आहे तेच नियम कायम राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

15 मे पर्यंत कडक निर्बंध…उद्या होणार घोषणा – मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
Advertisements
Advertisements
Advertisements