मुंबई,
राज्यातील 130 रुग्णालयांमध्ये ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून आज सोमवारी देण्यात आली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत उपचार मिळत आहे.
कोरोना महामारीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वतःहून याचिका दाखल केली. यावेळी खंडपीठाने ब्लॅक फंगसच्या उपचाराबाबत राज्य सरकारकडे विचारणा केली होती. त्याला उत्तर देताना राज्यातील 130 रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांवर मोफत उपचार केले जात असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. उपचारासाठी आणि औषधांसाठी लागणारा सर्व खर्च या योजनेतून केला जाणार आहे. तसेच रुग्णाच्या कुटुंबाकडे कुठल्याही रंगाचे अर्थात् पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड असेल त्या सर्वांना या योजनेतून मदत दिली जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.