शेवटच्या क्षणी दारूच्या कारवाया जोरात, सट्टापट्टीला मात्र खुली छूट.
(गडचांदूरात क्लब,सुगंधित तंबाखू विक्रिच्या बंदीवर हप्त्याची संक्रांत.)
कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या सहा वर्षांपासून दारूबंदी आहे.मात्र नुकतीच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारूबंदी हटवण्यात आल्याची घोषणा केली. “आडवी बाटली,उभी होणार” ही वार्ता अख्ख्या जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरताच काहींनी याचे स्वागत केले तर कहींनी निषेध. “कहीं खुशी तो कहीं गम” असे चित्र सध्या पहायला मिळत आहे.जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात बिनधास्तपणे सुरू असलेली अवैध दारूविक्री लक्षात घेता “दारूचा जणू महापूरच आला की काय” अशी परिस्थिती होती.यात गडचांदूर परिक्षेत्रही मागे नव्हते.येथील गल्लोगल्लीत सुरू असलेल्या दारूविक्री बद्दल नागरिक बोंबलत होते तेव्हा काही अपवाद वगळता थातूरमातूर कारवाया झाल्या.मात्र आता शेवटच्या क्षणी कारवाया वाढल्या परंतु शहरात ठरवून दिलेल्या ठिकाणी सट्टापट्टीचा व्यवसाय बिनधास्तपणे सुरू आहे. त्याचं काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून ठाणेदार याच्यावर कारवाई का करत नाही ! हा मात्र संशोधनाचा विषय बनला आहे.
याठिकाणी काही दिवसांपुर्वी सुरू असलेले जुव्याचे क्लब,सुगंधित तंबाखू विक्री सध्याच्या परिस्थितीत बंद आहे.सदर धंदे हप्त्याच्या गुंतागुंतीत अडकल्याची चर्चा असून अवैध धंदे सुरू राहिले तर गडचांदूर परिक्षेत्र एका “कुबेरच्या खजिन्या” पेक्षा कमी नाही अशी उपहासात्मक चर्चा ऐकायला मिळत आहे.एकेकाळी याठिकाणी तत्कालीन ठाणेदारांनी “नो सट्टा,नो दारू” असे आवाहन करून दारूविक्री सह इतरही अवैध धंद्यावर मोठ्याप्रमाणात अंकुश लावला होता.मात्र आताचे चित्र काही वेगळेच आहे.आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाल्याचे आरोप सुज्ञ नागरिकांकडून होत असून दारूबंदीच्या कारवाया सोबतच ठाणेदारांनी सट्टापट्टीही बंद केली तर शहरात अवैध धंदे हद्दपार झाल्याचे गर्वाने म्हणता येईल मात्र ही संधी मिळेल का ? हाच मोठा प्रश्न आहे.एलसीबीचे कर्तव्यदक्ष अधिकारी खाडे यांनी याकडे जातीने लक्ष देण्याची मागणी वजा विनंती “दै.चंद्रधून” च्या माध्यमातून काही सुज्ञ नागरिकांनी केली आहे.