मोहनलाल, मामूटी, रजनीकांत या अभिनेत्यांबरोबर अभिनेत्री अंजू अरविंदने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने केलेल्या सहाय्यक भूमिका खूप गाजल्या. अंजू ही केरळमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. एक उत्तम, प्रशिक्षीत डान्सर असलेल्या अंजूने अनेक मालिकादेखील केल्या आहेत. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री असलेल्या अंजूच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक चढ-उतार आले. तिने स्वतःच तिच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंजूने सांगितलं की तिने दोन लग्नं केली, पण दोन्ही नाती वाईटरित्या संपली. तिने तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला होता. त्यानंतर दुसरं लग्न केलं, पण लग्नानंतर काही काळातच तिच्या दुसऱ्या पतीचं निधन झालं. आता मागील पाच वर्षांपासून ती लिव्ह इनमध्ये राहतेय.
“मी पहिल्यांदा लग्न केलं आणि घटस्फोट झाला. मी दुसरं लग्न केलं आणि माझ्या पतीचं निधन झालं. आता मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. माझ्या जोडीदाराचं नाव संजय अंबाला परंबत आहे. आम्ही मागील पाच वर्षांपासून एकमेकांबरोबर आनंदाने राहतोय. त्यानेच मला बंगळुरूमध्ये डान्स प्रशिक्षक म्हणून ओळख मिळवून दिली. मी आठवीत असताना संजय माझा पहिला क्रश होता. आमची कहाणी फारच फिल्मी आहे,” असं अंजू अरविंद अवल विकटनला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.
आयटी सेक्टरमधून निवृत्त झालाय अंजूचा जोडीदार
“आम्हाला दोघांना 96 (विजय सेतुपती, त्रिशा क्रिष्णनचा तमिळ सिनेमा) हा चित्रपट खूप आवडतो. आम्ही हा चित्रपट एकत्र पाहिला होता. हा चित्रपट पाहून मला माझे शाळेतील दिवस आठवले. संजय डान्सर आहे, तो आधी आयटी सेक्टरमध्ये काम करायचा, पण आता निवृत्त झाला आहे. आम्ही दोघे पहिल्यांदा एका डान्स क्लासमध्ये भेटलो होतो, पण त्यावेळी मोबाईल फोन नव्हते, तर आम्ही आयुष्यात पुढे निघून गेलो. पण आम्ही पुन्हा एकदा भेटलो. त्यानेच बंगळुरूतील माझ्या डान्स अकॅडमीचं Anju Aravind Academy of Dance हे नाव ठरवलं,” असं अंजू अरविंद म्हणाली. अंजूला अन्विका नावाची मुलगी असून ती ११वीत शिकते.
सिबी मलयीलच्या ‘अक्षरम’ चित्रपटातून अंजूने पदार्पण केलं होतं. या चित्रपटात सुरेश गोपी व अॅनी मुख्य भूमिकेत होते. यानंतर अंजूने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं. यात ममूटींचे ‘अळक्या रावणन,’ ‘सिद्धार्थ’, मोहनलाल यांचा ‘नारण’, रजनीकांत यांचा ‘अरुणाचलम’, थलपती विजयचा ‘पूव उनाक्कगा,’ शिवराजकुमारचा ‘जानुमदथा’ व जयरामचा ‘स्वप्ना लोकथे बालाभास्करन’ या सिनेमांचा समावेश आहे.