राज्यात सर्वत्र गणपती उत्सवाची धामधुम सुरू होती. राज्यात मांसाहार करणाऱ्या खवय्यांची चिकन आणि मटणाच्या दुकानात मोठी गर्दी जमा झाली आहे. मटण प्रेमी मार्केटमध्ये चिकन आणि मटण खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने रांगेत उभे आहेत.
रविवारच्या दिवशी काही जणांकडे मटण खाण्याची परंपरा असल्याने अनेक ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात अनंत चतुर्थी नंतर रविवार आल्यामुळे चिकन आणि मटणावर ताव मारणाऱ्या खवय्यांनी चिकन मटणाच्या दुकानांच्या बाहेर रांगा लावल्या आहेत. आपला नंबर येण्यासाठी ग्राहकांना दोन ते तीन तासापर्यंत वाट पाहावी लागत आहे. गणपती उत्सव संपल्यामुळे मागणी वाढल्याने मटणाच्या दरात देखील वाढ झाली आहे. नागपूरमध्ये मटणाचा भाव ८८० प्रतिकिलो रुपये इतका आहे.
दुसरीकडे, शहराच्या प्रमुख भागांमध्येसुद्धा मटण-चिकन दुकानांवर ग्राहकांनी सकाळीच हजेरी लावली आहे. सुट्टीचा दिवस आणि त्यात रविवार अशी मस्त सांगड घालून अनेक जणांनी मांसाहाराचा बेत आखला आहे. खामला भागामध्ये प्रसिद्ध मटण दुकानांसमोर मटण खरेदीसाठी गर्दी झाली आहे. अगदी सकाळपासूनच मटणाच्या दुकानावर ही रांग लागली आहे. २ ते ३ तासापासून रांगेत उभा राहून नागरिक मटण घेत आहेत. महाल पूर्व स्टेशन परिसरातील जय भवानी मटणाच्या दुकानां समोरची दुपारी १ च्या सुमारासही मोठी गर्दी दिसून आली.
गणपती उत्सव संपल्यानंतर अनेक लोक चिकन, मासे आणि मटण खरेदी करण्यासाठी गर्दी करतात, कारण हा काळ मांसाहाराला सुरुवात करण्यासाठी अनुकूल मानला जातो. जिथे अनेक लोक सणासुदीच्या काळात घेतलेले शाकाहाराचे नियम सोडून मांसाहाराला सुरुवात करतात. या काळात दुकानांमध्ये लांबच लांब रांगा लागतात आणि ग्राहक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येतात.
या गर्दीची काही प्रमुख कारणे
शाकाहाराचा नियम सोडून मांसाहाराला सुरुवात: गणपती उत्सवादरम्यान अनेक लोक उपवास करतात किंवा शाकाहार पाळतात. उत्सव संपल्यानंतर, ते पुन्हा मांसाहार करण्यास सुरुवात करतात, ज्यामुळे चिकन आणि मटणाच्या दुकानांमध्ये गर्दी करतात. हा काळ सणासुदीनंतरचा असतो, त्यामुळे लोक आपल्या आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी उत्साही असतात.