आणखी 15 प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर सेवेत रुजू
– आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
चंद्रपूर,
माजी वित्तमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून आणखी 15 प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी वितरित करण्यात आल्याने ही संख्या आता 167 झाली आहे. यापूर्वी 152 प्राणवायू कॉन्सेन्ट्रॅटरचे वितरण करण्यात आले.
कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेचे संकट कमी होत आहे. तरीही खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असताना जिल्ह्यातील आरोग्यसेवा सर्व सोयीसुविधायुक्त व्हाव्या यासाठी आ. मुनगंटीवार यांच्यामार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून महानगर भाजपाच्या वतीने सोमवार, 7 जूनला शासकीय विश्रामगृह येथे आयोजित एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांच्या माध्यमातून व आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून प्राप्त झालेल्या 15 प्राणवायू कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध सेवाभावी संस्थांद्वारे करण्यात आले.
यावेळी महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, मनपा स्थायी समिती अध्यक्ष रवी आसवानी, माजी आ. अॅड. संजय धोटे, भाजपा महामंत्री राजेंद्र गांधी, भाजपा शहराध्यक्ष मंगेश गुलवाडे, ब्रिजभुषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, विशाल निंबाळकर आदींची उपस्थिती होती. मुनगंटीवार यांनी यापूर्वी आमदार निधीतून 8 रुग्णवाहिका, शासकीय रुग्णालयाला 17 व्हेंटीलेटर व 15 एनआयवी आरोग्य सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या. तर, जिल्ह्यात 5 लक्ष मुखाच्छादनाचे वितरण त्यांच्या मार्गदर्शनात भाजपातर्फे करण्यात आले. मागणीनुसार फेसशिल्डचेदेखील वितरण केले आहे.
विश्वभारत News Website