‘अल्ट्राटेक’च्या प्रवेशद्वारासमोर मृतदेह!
– जखमी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू
– आर्थिक मदत, नोकरीसाठी नातेवाईकांचा आक्रोश
गडचांदूर,
कर्तव्य बजावताना ईश्वर सेलोडकर हा कंत्राटी कामगार अपघातात जखमी झाला. चंद्रपुरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी त्याचा मृत्यू झाला. मात्र, अल्ट्राटेक सिमेंट कंपनी व्यवस्थापनाने मदत नाकारली. त्यामुळे मंगळवारी सकाळी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर मृतदेह ठेवण्यात आला. मृतकाच्या नातेईकांनी वैद्यकीय उपचाराचा खर्च, आर्थिक मदत व नोकरीसाठी ठिय्या मांडल्याने येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
अखेर कामगार संघटनांपुढे कंपनी प्रशासन नमले आणि मृत कामगारांच्या कुटुंबातील एकास कायमस्वरूपी नोकरी, वैद्यकीय खर्च व आर्थिक मदत देण्याची बाब मान्य केली. त्यानंतर मृतदेह उचलण्यात आला. कोरपना तालुक्यातील आवळपूरलगतच्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमध्ये मृतक ईश्वर सेलोडकर हा मागील काही वर्षापासून वीज विभागात कंत्राटी पद्धतीने काम करीत होता. साधारणतः 21 दिवसांपूर्वी त्याचा कर्तव्य बजावताना अपघात झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. कंपनीच्या रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने चंद्रपूर येथील एका खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. येथे काही दिवस उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना सोमवारी त्याची प्राणज्योत मालावली.
कामगार दगावल्याची माहिती मिळताच एलअॅण्डटी कामगार संघटना व विजय क्रांती कामगार संघटनेच्या पदाधिकार्यांनी कंपनी व्यवस्थापनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली. पण, त्यांनी नकार दिला. त्यामुळे कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर मृतदेह ठेवून आंदोलन केले गेले. वारंवार बैठका घेण्यात आल्या. पण, त्या निष्पळ ठरल्या. कंपनी व्यवस्थापनाने पोलिस प्रशासनाला पाचारण केले. येथे पोलिसांसमवेत दंगा नियंत्रण पथकही दाखल झाले होते. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कामगार संघटना व व कंपनी व्यवस्थापनाची चर्चा झाली. त्यात त्यांनी तब्बल पाच तासानंतर मागण्या मान्य केल्या. त्यानंतर तणाव निवळला.