Advertisements
राष्ट्रीय हत्ती रोग दुरिकरण मोहीम
* सामूहिकपणे गोळ्या घेऊन अधिकार्यांनी केला शुभारंभ
राजुरा, वार्ताहर –
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हत्तीरोगाचे दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम ( आयडीए ) निमित्य सतत 15 दिवस चालणाऱ्या मोहिमेच्या आज दिनांक 1 जुलै ला पहिल्या दिवशी राजुरा तालुक्यातील प्रमुख शासकीय अधिकार्यांनी स्वतः गोळ्या सेवन करून शुभारंभ केला. जनतेने स्वतः पुढे येऊन कसलीही शंका न ठेवता गोळ्यांचे सेवन करून हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन राजुरा उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांनी केले.
दिनांक 1 जुलै पासून 15 जुलै पर्यंत राष्ट्रीय हत्तीरोग मोहीम सुरू झाली आहे. राज्यातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ व नांदेड जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. दोन वर्षावरील लोकांना प्रत्यक्ष गोळ्या खाऊ घालण्याचा आणि हत्तीरोगावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न या मोहिमेद्वारे होत आहे.
या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार हरीष गाडे, गटविकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत, नायब तहसीलदार गांगुर्डे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहू कुळमेथे, राम इंगळे, मलेरिया पर्यवेक्षक प्रदीप हंबर्डे उपस्थित होते.
राजुरा तालुक्यात या मोहिमेद्वारे शहरी भागातील 30011 आणि ग्रामीण भागातील 98681 अशा एकूण 1 लाख 28 हजार 692 एवढ्या व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन या गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहे. याकरिता शहरी भागात 20 व ग्रामीण भागात 182 चमू बनविण्यात आल्या आहेत, अशी माहिती राजुरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे यांनी दिली.
Advertisements