वर्धा. समृद्धी महामार्गामुळे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासंदर्भात आमदार डॉ. पंकज भोयर यांनी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार व संबधित अधिका-यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पाहणी केली. यावेळी शेतक-यांनी महामार्गामुळे येत असलेल्या अडीअडणींची माहिती दिली. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी यासंदर्भात सतत पाठपुरावा केल्याने जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेत आज शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या.
आमदार डॉ. पंकज भोयर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन निर्माण झालेल्या समस्यांची माहिती जाणून घेतली होती. तसेच या संदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना समस्यांबाबत माहिती देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली होती. आज शुक्रवारी जिल्हाधिकारी यांनी समृद्धी महामार्ग चे अधिकारी, पाटबंधारे विभाग व महसूल विभागाच्या अधिका-यांसह पाहणी केली. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर व शेतक-यांनी महामार्गाच्या निर्मितीमुळे कालवे, पाटच-या, रोड सह शेतात साचत असलेल्या पाण्याची माहिती दिली. महामार्ग शेतक-यांसाठी वरदान ठरणार असल्याचे सांगण्यात येत होते परंतु प्रत्याक्षात महामार्ग काही चुकांमुळे शेतक-यांसाठी शापित ठरत असल्याची माहिती दिली. या समस्या तातडीने सोडविण्याबाबत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना आ. डॉ. भोयर यांनी सूचना केली.
सेलू पाटबंधारे उप विभागातंर्गत येणा-या आष्टा कॅनलला समृद्धी महामार्ग एक किमी पर्यंत क्रास झालेला आहे. महामार्गाच्या निर्मिती पुर्वी शेतक-यांना ये – जा करण्यासाठी कॅनलवर पुल बांधण्यात आला होता.परंतु समृद्धी महासमार्गाच्या बांधकामादरम्यान सदर पुल हटविण्यात आला व पुलाऐवजी कॅनल मध्ये पाईप टाकून ये जा करण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. आष्टा वितरीका दहेगाव शाखेची मुख्य वितरीका असल्याने पाण्याचा विसर्ग जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहासोबत अनेक गोष्टी वाहून येतात. परिणामी पाईप मध्ये जनावरे, कचरा, झाडे वाहून येऊन पाईप मध्ये अडकण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा प्रवाह बाधित होऊन लगतच्या शेतात पाणी शिरत असून कॅनलला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गाच्या निर्मिती दरम्यान हटविण्यात आलेला पुल नव्याने बांधण्यात यावा. कालव्याचा मधोमध पुलाचे तीन पिल्लर उभे करण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह बाधित झाला आहे. समृद्धी महामार्गमुळे बोर धरणाच्या कालव्यासह पाटच-यांची मोठया प्रमाणात हानी झाली असल्याचे पाहणी दौ-यात आढळून आले. इटाळा मायनर क्रमांक 1 मधील पाटचरी महामार्गाच्या बांधकामामुळे बुजल्या गेल्याचे दिसून आले. पंचाधारा प्रकल्पातंर्गत रेहकी उपवितरीका समृद्धी महामार्गाला लागून जाते.या ठिकाणी चेनेजवर बॉक्स कल्वर्ट व्दारे पाणी समोरील क्षेत्रात पोहचते. परंतु बॉक्स कल्वर्ट चे डीएस भागात कालवा बुजला असल्यामुळे पाणी रस्त्यावर येऊन समृद्धीच्या नालीव्दारे वाहून जात असल्याचे शेतक-यांनी सांगितले.
खडकी आष्टा लघु कालवा, रेहकी लघु कालवा व शिवपांधणाची यावेळी पाहणी करण्यात आली. यावेळी मरा रस्ते विकास महामंडळाचे प्रकल्प संचालक प्रशांत जनबंधू, रणदीवे, अॅपकान कंपनीचे कृष्णमूर्ती, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नितू चव्हाण, उपअभियंता अजय हिंगे,भाजपचे सेलू तालुका अध्यक्ष अशोक कलोडे, जिप सदस्य विनोद लाखे, विजय खोडे, शकील खोडे, रवींद्र सोमनाथे, मनोहरराव सोमनाथे, लीवन येळणे, नानाजी मुजबैले, राजू लाडीकर, जीवराज भावरकर, नानाजी दांडेकर, छोटू दांडेकर, दिनेश धोंगड़े, नरेश दांडेकर, बोंडाडे व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.