केदारनाथ : जगप्रसिद्ध केदारनाथ यात्रेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच भाविकांच्या गर्दीने सर्व जुने विक्रम मोडले आहेत.यंदा यात्रा काळात प्रथमच १२६ दिवसांत तब्बल ११ लाख भाविकांनी बाबा केदारनाथांचे दर्शन घेतले आहे.
२०१९ मध्ये सहा महिन्यांत १० लाख यात्रेकरू केदारनाथ धामला पोहोचले होते, मात्र यावेळी यात्रेने सर्व जुने विक्रम मोडले आहेत. अजून दीड महिन्याचा यात्रा कालावधी आहे. अशा परिस्थितीत केदारनाथला येणाऱ्या भाविकांचा आकडा १३ लाखांहुन अधिक होण्याची शक्यता आहे.
आपत्ती आणि विध्वंस
१६ आणि १७ जून २०१३ रोजी केदारनाथ धाममध्ये घडलेली विनाशकारी आपत्ती क्वचितच विसरता येणार आहे. या भयंकर आपत्तीत केदारनाथमध्ये मोठा विध्वंस झाला होता. ज्यात हजारो लोक मारले गेले. ती भीषण परिस्थिती पाहून यात्रा पुन्हा रुळावर यायला बरीच वर्षे लागतील असे वाटत होते, मात्र पुनर्बांधणीच्या कामामुळे आपत्तीनंतर पुढच्याच वर्षी यात्रा सुरू झाली. तर, आपत्तीनंतर २०१९ मध्ये विक्रमी १० लाख भाविक केदारनाथला पोहोचले होते.
त्यानंतर २०२० आणि २०२१ मध्ये करोना महामारीमुळे यात्रा प्रभावित झाली होती. आता केदारनाथ धाम यात्रा २०२२ मध्ये रीतसर सुरू झाली आणि यात्रेने सर्व विक्रम मोडून एक इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच ११ लाख भाविक अवघ्या १२६ दिवसांत केदारनाथला पोहोचले आहेत. अजून दीड महिन्याची यात्रा बाकी आहे. दररोज सात ते आठ हजार भाविक केदारनाथला पोहोचत आहेत. अशा स्थितीत केदारनाथ धामला येणाऱ्या भाविकांची संख्या १३ लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रोजगाराच्या संधी
केदारनाथ धामची यात्रा ६ मे रोजी सुरू झाली. सुरुवातीच्या टप्प्यात काही व्यवस्था विस्कळीत झाल्या होत्या, मात्र जिल्हा प्रशासनाने तातडीने व्यवस्था सुधारली. त्यानंतर प्रवाशांची संख्या वाढत गेली आणि प्रवासी येत राहिले. मोठ्या संख्येने येणाऱ्या प्रवाशांमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत.