विश्व भारत ऑनलाईन :
नाशिकच्या जगप्रसिद्ध सप्तशृंगी गडावर सध्या जवळपास पाच लाख भाविक अडकल्याची माहिती समोर येत आहे. भाविकांची गर्दी प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनाने आता नव्याने येणाऱ्या भाविकांना नांदुरी गावातच रोखून ठेवलं आहे. तर, यामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे.
खरंतर सध्या नवरात्र सुरु आहे. त्यामुळे सप्तश्रृंगी देवीच्या गडावर भाविकांची गर्दी जमणं हे साहजिकच आहे. पण आज गडावर सगळ्या सुविधांची पूर्तता करुन देखील भाविकांची गर्दी इतकी मोठी झाली की ती नियंत्रणात ठेवणं प्रशासनाच्या आवाक्याबाहेर गेल्याचं चित्र आहे. अर्थात भाविकांची गर्दीच तितकी आहे. पण या गर्दीमुळे अनेक भाविकांना देवीचं दर्शन न घेताच नांदुरी गावातून परतावं लागलं आहे.
राज्यात सर्वत्र नवरात्रीचा उत्साह आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमधील आज देवीची सातवी माळ आहे. विशेष म्हणजे आज अनेकांचा सुट्टीचा रविवार सुद्धा आहे. त्यामुळे नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर आज लाखो भाविकांनी दर्शन घेतलं. पण आज सगळ्याच भाविकांना सप्तश्रृंगी देवीचं दर्शन मिळालं नाहीय. सप्तश्रृंगी देवीच्या गडावर सध्याच्या घडीला लाखो भाविक अडकल्याची माहिती समोर आली आहे. भाविकांची गर्दी नियंत्रणात येत नसल्याने प्रशासनाने एकतर्फी वाहतूक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. गडावर अडकलेल्या जवळपास पाच लाख भाविकांना खाली आणण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.