विश्व भारत ऑनलाईन :
बदलत असणारी जीवनशैली, त्यात ड जीवनसत्त्व व कॅल्शियमची उणीव आणि उपचारांदरम्यान घेतलेल्या ‘स्टेराॅईड’मुळे आलेली ठिसूळता, करोनानंतर वर्क फ्राॅम होमची वाढती संस्कृती, अशा कारणांनी तरुणांमध्ये मणक्यांचे विकार वाढत आहेत. १६ ऑक्टोंबरला जागतिक स्पाईन दिवस आहे.
पाठीच्या मणक्यांच्या विकारात करोनापूर्वी आणि करोनानंतर ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचा अंदाज आहे. त्यात १८ ते ३५ वयोगटातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
कोणती कारणे?
करोनानंतर घरामध्ये ऑफिसची कामे करताना अयोग्य पद्धतीने बसणे, लोळून व लोटून काम करणे, टेबल वा खुर्चीची उंची योग्य नसणे, शिवाय दीर्घकाळापर्यंत एकाच स्थितीत बसून राहणे ही ‘वर्क फ्रॉम होम’मुळे मणक्यांचा विकार वाढीची कारणे आहे. तसेच अनेकदा व्यक्ती अतिरिक्त वेळेत काम केल्यानेही मणक्यावर ताण वाढतो.
आजची तरुणाई सूर्यप्रकाशात कमी जाते.सोबतच असंतुलित आहाराचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे ड जीवनसत्त्व व कॅल्शियमची उणीव शरीराला जाणवते. मणके व हाडे ठिसूळ होण्याचे हे एक कारण आहे. शिवाय कोविड दरम्यान देण्यात आलेल्या ‘स्टिरॉईड’ या संप्रेरकाच्या अतिरिक्त मात्रेमुळे देखील ‘ऑस्टिओपोरोसिस’ म्हणजे हाडे ठिसूळ होण्यासारखे विकारही वाढत आहे. त्यामुळे पाठीचे, कंबरेचे व मानेचे दुखणे आढळले तर दीर्घकाळापर्यंत ते अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घेणे व जीवनशैलीत आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. अन्यथा सायटिका, स्पॉन्डिलायटिस, मणका सरकणे यासारख्या विकारांना सामोरे जावे लागते.
तरुणांच्या पाठीचा कणा सुदृढ असेल, तर रोजच्या जीवनातील कामे सहजतेने होतील आणि दीर्घकाल निरोगी जीवन जगता येईल. मात्र, तरुणपणात पाठीच्या कण्याकडे लक्ष न दिल्याने पुढे आणखी त्रासाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे पाठ व मणक्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्याची आवश्यकता आहे.