विश्व भारत ऑनलाईन :
अखिल भारतीय हिंदू महासभेने सर्व चलनी नोटावरून महात्मा गांधीजीं ऐवजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो लावावा, अशी मागणी केली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाला दिलेले योगदान राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या कार्याशी तुलना करता कमी नाही, असेही या संघटनेने म्हटले आहे. याला अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनीही दुजोरा दिला आहे. सुभाषचंद्र बोस यांचे राष्ट्रहिताचे योगदान कमी करायला नको, असे स्पष्ट करीत नोटेवर बोस यांचा फोटो द्यावा, अशी मागणी कारेमोरे यांनी केली.
नवरात्रीच्या काळात या संघटनेने कोलकाता येथे महात्मा गांधीजींचा पुतळा महिषासुराच्या रूपात दाखवल्याने मोठा वाद झाला होता. आता या संघटनेने नवी मागणी करीत नव्या वादाला तोंड फोडले आहे.
संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष चंद्रचुड गोस्वामी यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. ते म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना हिंदूंचे हित जपण्यात अपयश आले आहे. त्यामुळे हिंदू महासभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे.” गांधींजीचा पुतळा महिषासुरू रूपात दाखवण्याचा संघटनेचा कोणताही हेतू नव्हता, हा प्रकार अनावधानाने घडला होता, असेही ते म्हणाले.