राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत टीका करीत शिवीगाळ केली होती. सत्तार यांच्या या कृतीने राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला. मंत्रिपदी असताना एका महिला नेत्याला शिवीगाळ करणाऱ्या सत्तार यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करत राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. तसेच काही महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाने या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत निवेदन दिले.
अखेर राज्यपालांनी या निवेदनाची दखल घेतली असून या संदर्भातील निवेदन उचित कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार फौजिया खान यांनी माहिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारमधील जबाबदार पदावर कार्यरत असणाऱ्या मंत्र्यांनी महिलांबाबत अपमानास्पद विधाने केली. याच्या निषेधार्ह सर्वपक्षीय महिला आमदार, खासदारांच्या शिष्टमंडळाने राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदन दिले होते. याची दखल राज्यपालांनी घेतली असून या संदर्भातील निवेदन उचित कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. याबद्दल राज्यपाल महोदयांचे आभार,’ असं ट्वीट फौजिया खान यांनी केले आहे.