नागपुरातील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातील पर्यटनही आता व्याघ्र प्रकल्प पर्यटनाच्या वाटेवर आहेत. नुकताच येथे एका पर्यटक बसचा अपघात झाला. वाघांच्या पिंजरा परिसरात हा अपघात होऊन एका बसचा काच फुटल्याने पर्यटकांसाेबतच वन्यप्राण्यांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तर दुसरीकडे लाखो रुपयाचे एक वाहन(बस) मात्र परिसरात उभेच आहे.गेल्या आठवड्यातच वाघांच्या पिंजरा परिसरात एकापाठोपाठ एक अशी तीन पर्यटक वाहने होती. त्यातील एका वाहनाने ‘ब्रेक’ दाबल्याबरोबर ती वाहने एकमेकांना धडकली आणि वाहनाचा काच फुटला. ही घटना थोडक्यात निभावली आणि वाहनातील एक पर्यटक किरकोळ जखमी झाला. मात्र, पिंजरा परिसरात वाहनाचे काच पडले असते तर वाघांच्या जिविताची जबाबदारी प्रशासनाने घेतली असती का.
अस्वल आणि बिबटच्या पिंजरा परिसरात हा अपघात झाला असता तर हे वर चढणारे वन्यप्राणी असल्याने ते फुटलेल्या बसमध्ये चढू शकले असते. अशावेळी पर्यटकांच्या जिविताची जबाबदारी प्रशासनाने घेतली असती का, असे प्रश्न पर्यटकांनी उपस्थित केले आहेत. केवळ महसूलात भर घालण्यासाठी गोरेवाडा प्रशासनाकडून पर्यटक आणि प्राणीसंग्रहालयातील वन्यप्राण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
याबाबत प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.२०१७-१८ साली बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात सुमारे २५ लाख रुपये किंमतीचे एक वाहन (बस) खरेदी करण्यात आले. मात्र, तेव्हापासून आजतागायत हे वाहन प्राणीसंग्रहालय परिसरात तसेच उभे आहे. लाखो रुपयाचे हे वाहन पर्यटकांसाठी ‘सेल्फी पॉईंट’ ठरले आहे.