राज्यात सोमवार, अर्थात 20 मार्चपासून विदर्भ वगळता उर्वरित भागात पावसाळी वातावरण कमी होणार आहे. विदर्भात मंगळवारपर्यंत ढगाळ वातावरण राहील. सोमवारपासून पुढील तीन दिवसाच्या कमाल तापमानात 4 अंश सेल्सियसने वाढ होण्याचा अंदाज आहे.
राज्यात गारपिटीचा कालावधी 26 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत असतो. कधी मार्चअखेर किंवा एप्रिलमध्येही गारपीट होते. देशात सर्वात जास्त गारपीट महाराष्ट्रात होते. त्यातही उत्तर विदर्भात तिचा जोर अधिक असतो.
गारपीटीचे कारण ?
जमिनीवरून वारे समुद्रात घुसतात व समुद्रातून आर्द्रता महाराष्ट्र व सभोवताल भागात ओततात. हा वाऱ्याचा प्रवाह जेव्हा तीव्र होतो व त्याच वेळी अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे उलट दिशेने ईशान्येकडे निघतात तेव्हा थंड व बाष्पयुक्त वारे यांची टक्कर होते. म्हणजे सरळ द्रवीकरण होऊन बर्फाच्या तुकड्यात त्याचे रूपांतर होते. हवेच्या घर्षणाची शक्ती अपुरी पडल्यामुळे पावसाच्या थेंबाबरोबर लहान-मोठे जे बर्फाचे गोल तुकडे घर्षणाने बारीक गोलाकार हाेऊन येतात त्याला गारपीट म्हणतात.