बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईरालाची गणना ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये केली जाते. अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये एकापेक्षा अनेक सरस चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने हिंदीशिवाय तमिळ, तेलुगू भाषेतही चित्रपट केले आहेत. तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त मनिषा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. तिचं नाव नाना पाटेकरबरोबर जोडलं गेलं, त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही आल्या, पण त्यानंतर मनिषाने नेपाळचे बिझनेसमन सम्राट दहलशी लग्न केलं, पण लग्नाच्या दोन वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. आता अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीने तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत.
मनिषा कोईरालाने अलीकडेच एका यूट्यूब चॅनलशी बोलताना सांगितले की, “मी फेसबुकच्या माध्यमातून सम्राटला भेटले. त्यानंतर आम्ही दोघे एकमेकांना भेटू लागलो. २०१० मध्ये मी सम्राटशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तो माझ्यापेक्षा सात वर्षांनी लहान होता. आम्ही काठमांडूमध्ये लग्न केले आणि याबद्दल कोणालाही सांगितलं नाही, जेणेकरून आमचे लग्न हे अरेंज्ड मॅरेज आहे, असं वाटेल.” पण, लग्नाच्या सहा महिन्यांनंतरच तिच्या आणि सम्राटमध्ये भांडण सुरू झाले आणि संबंध बिघडले, त्यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
अभिनेत्री पुढे म्हणाली, “वर्ष २०१२ मध्ये आम्ही घटस्फोटाची घोषणा केली होती. घटस्फोटानंतर मी माझ्या आयुष्यात खूप एकटी पडले होते. लग्नानंतर माझी खूप स्वप्ने होती. जी कधीच पूर्ण होऊ शकली नाहीत, पण यात कोणाचाही दोष नाही. एखाद्या नात्यात तुम्ही आनंदी नसाल तर वेगळे होणे हा एकमेव पर्याय आहे. आमच्या लग्नाच्या सहा महिन्यांतच माझा नवरा माझा शत्रू झाला होता. एका स्त्रीसाठी यापेक्षा वाईट काय असू शकते,” असं मनिषाने सांगितलं.