चंद्रपूर जिल्ह्यासह सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे अवकाशातून कोसळलेले रिंग व सिलिंडर हे चीनच्या लाँगमार्च सॅटेलाईचे तुकडे असल्याचे निष्पन्न झाले. यावर इस्रो व अमेरिकेच्या चंद्रा ऑब्झर्व्हेटरी या संस्थेने शिक्कामोेर्तब केले.
कधी घडली घटना?
इस्रोने या बाबतचा अहवाल राज्य सरकारला सोपविला आहे. मागील वर्षी 2 एप्रिलला रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात रात्री साडेआठच्या सुमारास एक भली मोठी रिंग व फुटबॉलच्या आकाराचा सिलिंडर अवकाशातून कोसळला. सिंदेवाही पोलिसांनी घटनेची पहाणी करून अवकाशातून कोसळलेल्या वस्तू ताब्यात घेतल्या होत्या. त्याच रात्री कोसळलेले फुटबॉलच्या आकाराचे साहित्य ब्रह्मपुरी, चिमूर व सिंदेवाहीच्या अनेक भागात आढळले. ठिकठिकाणी त्या वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या.
15 एप्रिलला इस्रोचे दोन वैज्ञानिक एम. शहाजहान, मयूरेश शेट्टी व स्कॉयवॉच गृपचे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी लाडबोरी गावाला भेट देऊन पाहणी केली. सिंदेवाही पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलेल्या त्या वस्तुंचे निरीक्षण करून त्या वस्तू निरीक्षणाकरता नेण्यात आल्या. चीनच्या लाँगमार्च सॅटेलाईटचे ते तुकडे असल्याचे निष्पन्न झाले. चीनने लाँगमार्च हा उपग्रह अवकाशात सोडला होता. सदर उपग्रह हा बंगालच्या खाडीत पडणे अपेक्षित होते. परंतु त्या उपग्रहाचे तुकडे समुद्रात न पडता चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागांत कोसळले.