अकोला शहरातून एक आगळीवेगळी घटना समोर आली आहे. उतावळा नवरा लग्नाआधीच भावी पत्नीला घेवून पळाल्याची घटना अकोट फैल भागात घडली. याप्रकरणी भावी जावयाविरुद्ध अकोट फैल पोलिसात सासुबाईनेच तक्रार दाखल केली आहे. भावी जावई अमरावती येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे.
तक्रारीनुसार त्यांच्या अल्पवयीन मुलीचा साखरपुडा अमरावती येथील एका युवकासोबत झाला होता. परंतु मुलीचे वय कमी असल्याने, त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये लग्न ठरविले. मुलीचे वय १७ वर्ष ६ महिने होते, जानेवारी महिन्यात मुलीचा साखरपुडा आटोपला आणि कुटूंबियांनी १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांचा विवाह निश्चित केला. परंतु भावी जावयाने त्यापूर्वीच मुलीला काही कारणास्तव फूस लावून पळविले. मुलीसोबत भावी जावयाचे फोनवर नियमित बोलणे व्हायचे.
मुलीला बरे वाटत नसल्याने, अमरावती येथील भावी जावई २५ मार्च रोजी मुलीला भेटण्यासाठी घरी आला. जावई म्हणून सासुनेही आदरातिथ्य केले. सासुला काही काम असल्यामुळे ती बाहेर निघुन गेले.घरी परतल्यावर भावी जावई आणि मुलगी दिसून आली नाही. दोघेही बाहेर गेले असतील. असा अंदाज तक्रारदार महिलेने बांधला. परंतु रात्री उशिरापर्यंत दोघेही परतले नसल्याने शेवटी पोलिसात धाव घेतली. यात पोलिसांनी भावी जावयाविरूद्ध गुन्हा दाखल केला.
विश्वभारत News Website