शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आपल्याच पक्षातील बंडखोरांना धोबीपछाड दिल्याची जोरदार चर्चा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस असल्याचं बोललं जातंय. यातलाच एक गट भाजपसोबत जाण्याच्या मनस्थितीत होता. पवारांना याची कुणकुण लागली आणि त्यामुळेच त्यांनी हे राजीनामास्त्र बाहेर काढल्याचं सांगण्यात येतंय.
अजित पवार यांना धक्का
2019 मध्ये अजित पवारांनी बंड करून सकाळचा शपथविधी घडवून आणला. मात्र पवारांनी वेळीच ते बंड मोडून काढलं. आता पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा होती. तसं झालं असतं तर पवारांच्या पदरात मोठी नामुष्की पडली असती. कारकिर्दीच्या सुरूवातीलाच बसलेला धूर्त राजकारणी हा शिक्काही उत्तरार्धात अधिक ठळक झाला असता. मात्र राजीनाम्याच्या खेळीनं राष्ट्रवादीतल्या बंडाला खीळ बसल्याचं मानलं जातंय. सारं राजकारण पवारांभोवती केंद्रित झाल्यानं विरोधकांसाठीही हा पॉवरफुल्ल दणका असल्याचं मानलं जातंय.
देशाच्या राजकारणात शरद पवार हे मुरब्बी राजकारणी मानले जातात. पवारांच्या मनात नेमकं काय सुरूंय हे कुणीही सांगू शकत नाही असं त्यांच्याबद्दल कायम बोललं जातं. याहीवेळी त्यांनी केवळ कुटुंबातील चार व्यक्ती वगळता आपल्या राजीनाम्याचा सुगावा कुणालाही लागू दिला नाही. त्यांचा हा मास्टरस्ट्रोक पक्षातील संभाव्य बंडखोरांना एकाकी पाडण्यात यशस्वी ठरलाय असं म्हणायला हरकत नाही.
विश्वभारत News Website