विविध कारणामुळे अनेकांना हृदयाशी संबंधीत आजार दिसून येतात. अशात बीपी, कोलेस्ट्रॉल आणि लिपिड प्रोफाइलची लेव्हल चेक करण्यासाठी कार्डियाक प्रोफाइल टेस्ट ही अनेकजण करतात पण कार्डिओलॉजिस्ट हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी एका विशेष तपासणीची सुद्धा शिफारस करतात. विशेषत: जेव्हा रुग्णाला उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, मधुमेह, लठ्ठपणा, आनुवंशिक आजार आणि धुम्रपान करण्याची सवय असते, तेव्हा ही टेस्ट आवर्जून करावी, असे सांगितले जाते.
या टेस्टला कॅल्शियम स्कोअर किंवा CAC (Coronary Artery Calcium Score) स्कोअर असे संबोधले जाते.
कॅल्शियम स्कोअर म्हणजे काय? टेस्ट कशी केली जाते?
डॉ. सांगतात की, “या टेस्टमध्ये सीटी स्कॅन असतो आणि ही टेस्ट कोणत्याही प्रकारे शरीरावर शस्त्रक्रिया न करता केली जाते. या टेस्टद्वारे तुमच्या आर्टेरीमधील कॅल्सिफाईड प्लेकचे प्रमाण मोजले जाते. हे प्रमाण मोजणे खूप जास्त गरजेचे आहे कारण प्लेकच्या वाढीने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात ज्यामुळे रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि हार्ट अटॅकचा किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.ही टेस्ट प्लेकचे प्रमाण मोजते. प्लेक हा एक मेणासारखा पदार्थ आहे जो थेट सीटी स्कॅनमध्ये दिसत नाही पण फॅट आणि कॅल्शियमच्या मिश्रणामुळे काही काळानंतर कॅल्शियम आर्टिअरीमध्ये साचते आणि हे कॅल्सिफिकेशन सीटी स्कॅनमध्ये दिसते. प्लेक हा रक्त प्रवाहात अडथळा आणतो. ऑक्सिजेनेटेड रक्त जेव्हा हृदयापर्यंत पोहचत नाही त्यामुळे ब्लॉकेज तयार होतात आणि हार्ट अटॅक येतो. तुमचा कॅल्शिअम स्कोअर आर्टिअरीमधील प्लेकचं प्रमाण मोजण्यास मदत करतो.
टेस्टचा स्कोअर जास्त असेल तर तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका असतो पण याचा अर्थ असा नाही की पुढच्या क्षणी तुम्हाला हार्ट अटॅक येईल. हा फक्त अलार्म असतो जो आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी सुचित करतो आणि योग्य औषधी घेण्यास किंवा लाईफस्टाइल सुधारण्यास सुचवितो.”
स्कोअरचा अर्थ समजून घ्या
शून्य: याचा अर्थ तुमच्या आर्टिअरीमध्ये कॅल्सिफाइड प्लेक नाही. तुम्हाला कोरोनरी आर्टिअरी आजाराचा कमी धोका आहे.
० ते १०० : तुमच्या आर्टिअरीमध्ये प्लेक आहे ज्यामुळे हार्ट अटॅकचाही धोका आहे. हीच वेळ आहे ती तुम्ही चांगल्या लाइफस्टाइलचा प्लॅन करावा.
१०० ते ३०० : या स्कोअरचा अर्थ आहे की तुम्हाला हार्ट अटॅकचा अधिक प्रमाणात धोका आहे. तुम्ही तुमची लाइफस्टाइल सुधारुन हा धोका कमी करू शकता.
३०० आणि त्यावर : तुम्हाला हार्ट अटॅकचा खूप जास्त धोका आहे. तुमच्या कार्डिओलॉजिस्टचा सल्ला लवकरात लवकर घेणे आवश्यक आहे. स्टॅटिन्स थेरेपी करून कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याबाबत आपण तज्ज्ञांकडे विचारणा करायला हवी.
डॉ. सांगतात की जेव्हाही पेशंटचा स्कोअर हा शंभरच्या वर असेल त्या लोकांनी ‘स्ट्रेस टेस्ट’ सुद्धा करावी.
कोणी टेस्ट करावी आणि कोणी करू नये?
जर तुमच्या मनात शंका असतील, तेव्हा शंकेचे निरसन करण्यासाठी तुम्ही ही टेस्ट करावी. जर एकदा तुम्हाला हार्ट अटॅक आला त्यानंतरही ही टेस्ट करण्याची आवश्यकता नाही कारण यानंतर तुमची ट्रिटमेंट ही एका प्रोटोकॉल अंतर्गतच होणारअसते. गर्भवती महिलांनीही ही टेस्ट करू नये. तर इतर लोकांना ही टेस्ट करायची असेल तर सीटी स्कॅननंतर पाच वर्षाचे अंतर ठेवावे.
स्टॅटीन्स कॅल्शियम स्कोअर वाढवतो का?
स्टॅटीक थेरेपीमुळे फक्त कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होत नाही तर आर्टिअरीमधील प्लेक्स पण बदलते ज्यामुळे प्लेक्स खूप जास्त कल्सिफाइड होतात. स्टॅटिन्स प्लेकमधील लिपिड काढून टाकते आणि त्यामुळे प्लेकमध्ये कॅल्शियम राहते. फॅटी प्लेक्स शरीरासाठी हानिकारक असतात तर कॅल्शियम प्लेक्स स्थिर असतात. शरीरातील रक्त प्रवाहामुळे अनेक आजार आणि धोके उघड होतात पण यामुळे आर्टिअरीमधील प्लेकचे प्रमाण मोजले जात नाही. अनेकदा आपल्याला अनपेक्षित परिणाम मिळतात. काही लोकांना हृदयाचे आजार नसतात तरी त्या लोकांच्या आर्टिअरीमध्ये खूप जास्त प्रमाणात प्लेकचे प्रमाण दिसून येते तर कधी कधी ज्या लोकांना संबंधीत आजार असतात, त्या लोकांच्या आर्टिअरीमध्ये खूप कमी प्रमाणात प्लेक दिसून येते.
कॅल्शियम स्कोअर टेस्ट ही एक धोक्याची सुचना देणारे मॉडेल आहे. जे तुम्हाला वेळीच सावध करुन लाइफस्टाइल सुधारण्याचा मदत करते. त्यामुळे या टेस्टला घाबरू नका. हाय स्कोर असेल तर घाबरण्याचे कारण नाही कारण अशावेळी तुमच्या कार्डिओलॉजिस्टनी तुमच्या हार्टच्या चांगल्या आरोग्यासाठी ठेवण्यासाठी खूप आधीच स्टॅटीन थेरेपी आधीच सुरू केली असणार. प्रत्येकाने ही टेस्ट करावी, असे गरजेचे नाही. पण यासाठी कार्डिओलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे.