हवामान खात्याने रविवारी (दि.११) मान्सून राज्यात दाखल झाल्याचे जाहीर केले. यानंतर दृष्टी जीवरक्षक संस्थेने मान्सून काळात समुद्रात पोहण्यास बंदी घातली आहे. पावसाळ्यात लाटांची उंची, तीव्रता आणि समुद्रातील लाटांची वारंवारताही खूप जास्त असते. या पार्श्वभूमीवर दृष्टीने स्थानिक आणि पर्यटकांसाठी मान्सून काळासाठी मार्गदर्शक तत्वे जरी करण्यात आली आहेत.
यानुसार, सर्व समुद्रकिनार्यांवर पोहण्यास बंदी दर्शविणारे लाल झेंडे लावण्यात आले आहेत.
खडकाळ प्रदेश, खडक आणि किनार्यांवरील टेकड्या टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जलक्रीडांसह समुद्रस्नान करण्यासही बंदी घातली आहे. दृष्टीचे नवीन अवस्थी यांनी समुद्रकिनार्यावर तैनात जीवरक्षक हवामानावर बारीक लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.
याशिवाय मार्गदर्शक तत्त्वात जीवरक्षकांच्या सूचनांचे पालन करणे, निसरड्या खडकांवर न जाणे, विजा चमकत असताना किनार्यावर किंवा पाण्यात न जाणे, समुद्रकिनार्यावर न पोहणे, कोणत्याही जलक्रीडा उपक्रमात सहभागी न होणे या सूचनांचाही समावेश आहे. जून ते सप्टेंबर काळात समुद्र जरी शांत वाटत असला तरी, अचानक मोठी लाट येऊन खोल पाण्यात खेचू शकते, असेही दृष्टीने म्हटले आहे.