राज्यात संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेस पात्र ठरण्यासाठी लाभार्थ्यांना 21 हजार रुपये उत्पन्न मर्यादा आहे. ती आता 50 हजार रुपये करण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली.
संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेसाठी 21 हजार रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्यांना पात्र ठरविले जाते. त्यामुळे या योजनांमधील लाभार्थी कमी होत आहेत. निराधार महिलांना राज्याच्या या योजनांचाच आधार आहे. मात्र, उत्पन्न मर्यादेमुळे लाभार्थ्यांची संख्या कमी होत आहे, असा मुद्दा प्रणिती शिंदे यांनी या लक्षवेधीद्वारे मांडला. या दोन्ही योजनांचे मिळून राज्यात 41 लाख लाभार्थी आहेत. या योजनांवर सरकार साडेसात हजार कोटी रुपये खर्च करते. अशावेळी उत्पन्न मर्यादा 50 हजार रुपयांनी वाढवली, तर सरकारवर आर्थिक भार वाढेल, त्यामुळे टप्प्याटप्प्याने उत्पन्न मर्यादा वाढवली जाईल, असे हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
आमदाराला देता; मग गरिबाला का नाही : जयंत पाटील
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी, सरकार जर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना 50 कोटी, 100 कोटी, 200 कोटींचा निधी दिला जातो; पण गरिबांना देताना हात का आखडता घेता. तुम्हाला आमदाराला निधी देताना पैसे कमी पडत नाहीत; तर मग गोरगरिबांना मदत करताना पैसे कमी का पडतात? असा टोला मुश्रीफ यांना लगावला. तुम्ही आधी उत्पन्न मर्यादा 50 हजार करा, असे खासगीत आम्हाला सांगत होता. आता तुम्ही मंत्री झाल्यानंतर का ते करत नाही. अर्थमंत्री तुमचेच आहेत. घोषणा करा, असे आवाहनही जयंत पाटील यांनी मुश्रीफ यांना केले.