वन विभागातील पदभरती चांगलीच चर्चेत आहे. आता शिपाई पदासाठी ऑनलाईन परीक्षेवेळी अंतर्वस्त्रामध्ये कम्युनिकेशन डिव्हाईस व मायक्रोफोन ठेवून नक्कल करण्याचा हायटेक प्रकार तपासणी पथकाच्या तपासणीत बुधवारी उघडकीस आला. या प्रकरणी परीक्षार्थीसह चौघाविरूध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगलीतील वसंतदादा पाटील इन्स्ट्यिूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयात वन विभागाच्या कर्मचारी भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा केंद्र आहे. बुधवारी दुपारी परीक्षेपुर्वी आयोजक कंपनीकडून परीक्षार्थींची तपासणी करीत असताना उमेश संजय हुसे (रा.छत्रपती संभाजीनगर) यांने अंतर्वस्त्रामध्ये कम्युनिकेशन डिव्हाईस लपविले असल्याचे समोर आले.
परीक्षार्थीची कसून चौकशी केली असता नक्कल करण्यासाठी बालाजी तोगे (रा. आडगाव, जि. छत्रपती संभाजी नगर) यांने दिले असून यासाठी राजू नांगरे व अजय नांगरे (रा. काद्रा बादता, छ. संभाजीनगर) यांनी मध्यस्ती केल्याची कबुली दिली. या प्रकरणी दोन एजंट, कॉपीसाठी साहित्य पुरवठा करणारा तोगे आणि संबंधित परीक्षार्थी अशा चौघाविरूध्द बुधवारी रात्री विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसापुर्वी याच परीक्षा केंद्रावर तोतया विद्यार्थी आढळला होता. तर तत्पुर्वी अशाच प्रकारे नक्कल करण्याचा प्रकार आढळला होता.