भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील घटना
खिशात ठेवलेल्या मोबाइलमध्ये अचानक बिघाड झाल्याने त्याचा स्फोट झाला. यात बालक जखमी झाल्याची घटना तालुक्यातील प्रसिद्ध चांदपूर येथील हनुमान मंदिर परिसरात घडली. या घटनेत चांदपूर येथील १२ वर्षीय प्रीतम किशोर वाघरे हा जखमी झाला.
सातवीत शिक्षण घेणाऱ्या प्रीतमच्या वडिलांचे प्रसिद्ध चांदपूर येथील हनुमान मंदिर देवस्थानच्या आवारात पूजा साहित्य विक्रीचे दुकान आहे. रविवारी शाळेला सुट्टी असल्याने प्रीतम नेहमी प्रमाणे वडिलांच्या दुकानात गेला. जातांना सोबत वडिलांचा मोबाइल पँटच्या खिशात टाकून दुकानाकडे निघाला. दुकानाजवळ पोहोचल्यानंतर त्याच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलमुळे त्याला पँटमध्ये अचानक खिशातून धूर निघत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे प्रीतमने खिशात हात घालून तातडीने मोबाइल बाहेर काढून फेकला. दरम्यान, मोबाइलचा स्फोट झाला. मात्र मोबाइल बाहेर काढल्यानंतर फुटला, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, पँटच्या खिशात मोबाइलने पेट घेतल्याने त्याच्या पायाला जखम झाली. यावेळी उपस्थितांनी त्याला मदत करून तातडीने खासगी रुग्णालयात नेत दाखल केले. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी, मोबाइलचा स्फोट झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.