तर्री पोहे ही नागपूर आणि अख्ख्या विदर्भाची ओळख आहे. तर्री म्हणजे रस्सा, पश्चिम महाराष्ट्राच्या भाषेत बोलायचे झाले तर कट. पण तर्रीची मजा फक्त नागपुरात अनुभवता येते. तर्री म्हणजे काळ्या चण्याची सावजी मसाला घातलेली उसळ, त्यावर रस्सा आणि त्यावर तेलाचा तवंग म्हणजे तर्री पोह्यांवर टाकली, त्यावर बारीक कांदा, शेव, लिंबाची फोड घातली की सगळा लज्जददार मामला तयार.
कोणताही ऋतू असला तरी नागपूरकरांची सकाळ तर्री पोह्यानेच होते. अगदी पहाटे चार ते दुपारी अकरा वाजतापर्यंत तर्री पोह्याच्या गाड्या सुरू असतात. तर्री पोहे खाण्यासाठी सकाळची वेळ उत्तम असते. नागपुरात आढावा बैठकीसाठी आलेले राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनाही तर्री पोह्यावर ताव मारण्याचा मोह आवरला नाही. पोह्यांवर गावराणी चण्याच्या उसळीचा लाल तर्रीदार रस्सा, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून वरतुन बारीक शेव टाकून केलेले पोहे पाहिले की तोंडाला पाणी सुटते.
बुधवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते आ. रोहित पवार, रोहित पाटील यांचे विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. तेथून ते थेट छत्रपती नगर चौकात आले. त्या ठिकाणी या युवा नेत्यांनी शामजी पोहेवाले येथे तर्री पोह्याचा आस्वाद घेतला. त्यानंतर चहाचा आस्वाद घेत दिवसभराच्या कार्यक्रमावर चर्चा केली. महत्त्वाचे म्हणजे रोहित पवार “घेऊन आलोय साहेबांचा संदेश’ या कार्यक्रमांतर्गत विदर्भातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे.