Breaking News

हिंदुत्वाच्या आधारावर भाजपची सत्तेवर पकड

Advertisements

मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झालेला आहे. हिंदुत्व अखेर भाजपच पुढे घेऊन जाऊ शकते. तसेच भाजपमुळे हिंदुत्व जिवंत आहे, असेही या निकालाने दाखवून दिले आहे. राजस्थानमध्ये काँग्रेससाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिलेली एकाकी झुंज अपयशी ठरली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा, मुस्लिमबहुल मतदारसंघामध्ये यशस्वी ध्रुवीकरण आणि गुर्जर, जाट, राजपूत या प्रमुख जातींची अनुकुलता भाजपसाठी सत्ता मिळवून देणारी ठरली. भाजपच्या विजयामुळे दर पाच वर्षांनी सत्ताबदलाची परंपरा राजस्थानी मतदारांनी कायम राखली.

Advertisements

राजस्थानमधील अंतर्गत संघर्षामुळे त्रस्त झालेल्या भाजपने वसुंधरा राजेंसारख्या दिग्गज नेत्यांची मक्तेदारी मोडून काढत पुन्हा सत्ता ताब्यात घेतली आहे. मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानमध्येही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यास नकार दिला होता. त्याऐवजी दियाकुमारी, बाबा बालकनाथ, विरोधीपक्षनेते राजेंद्र राठोड यांच्यासह केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुनराम मेघवाल, अश्विनी वैष्णव आदी नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत ठेवली होती. वसुंधरा राजेंचा प्रभाव लक्षात घेऊन त्यांच्या समर्थक आमदारांना उमेदवारी दिली गेली असली तरी, निवडणुकीच्या प्रचारातून राजेंना दूर करून संपूर्ण निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढली गेली. राजस्थानमध्ये मोदी हेच भाजपचे प्रमुख प्रचारक होते!

Advertisements

पंतप्रधान मोदींनी राजस्थानमध्ये महिला व दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आक्रमक प्रचार केला. मध्य प्रदेशात काँग्रेसने शिवराज यांच्या भ्रष्टाचाराविरोधात प्रचार केला तसा, मोदींनी राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या ‘लाल डायरी’चा उल्लेख करत कथित भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला. गेहलोतांचा मुलगा वैभव तसेच, प्रदेशाध्यक्ष व शिक्षणमंत्री गोविंद डोटासरा यांच्या कुटुंबियांविरोधात ‘ईडी’ची कारवाई या दुहेरी रणनितीचा भाजपला फायदा मिळाल्याचे दिसत आहे. इथेही मोदींनी महिला, दलित, शेतकरी आणि ओबीसी या समूहांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे आश्वासन दिल्याचा सकारात्मक परिणाम झालेला दिसत आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी २५ लाखांच्या आरोग्य विम्याची चिरंजीवी योजना मतदारांपर्यंत पोहोचली होती व या योजनेचा काँग्रेसला राजकीय लाभ मिळण्याची आशाही वाटत होती. काँग्रेससाठी गेहलोतांची ही एकमेव लाभाची योजना होती. पाचशे रुपयांमध्ये गॅस सिलिंडर, महिलांना भत्ता आदी आश्वासने दिली असली तरी, भाजपनेही हीच आश्वासने दिल्यामुळे काँग्रेसच्या रेवडींपेक्षा भाजपची रेवडी अधिक प्रभावी ठरली असे दिसते. गेल्या पाच वर्षांमध्ये काँग्रेसचे अस्थिर सरकार वाचवण्यात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना यश आले असल्याने त्यांना ‘जादूगार’ म्हटले जाऊ लागले होते. मध्य प्रदेशमध्ये जशी शिवराज यांच्याविरोधातील नाराजी उघडपणे बोलून दाखवली जात होती, तशी राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्याविरोधात नाराजी पाहायला मिळाली नाही. त्यामुळे काँग्रेसला विजयाची आशा होती पण, गेहलोत यांच्या आमदारांविरोधात जनमत निर्माण होत गेल्याचा फटका काँग्रेसला बसल्याचे मानले जात आहे.

काँग्रेसने ऐक्याचे चित्र उभे केले असले तरी, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यामधील मतभेद मिटले नाहीत. त्यातच गेहलोत यांच्यावर राहुल गांधी नाराज असल्याची चर्चाही रंगली होती. गेल्यावेळी पायलट मुख्यमंत्री होण्याची शक्यता गृहित धरून गुर्जर मतदारांनी काँग्रेसला मतदान केले होते. पण, पायलटांना मुख्यमंत्री न केल्याचा राग गुर्जरांनी भाजपला मतदान करून व्यक्त केल्याचे सांगितले जाते. मुस्लिम, मीणा, दलित समाजातील मते काँग्रेसला मिळाल्याचे प्राथमिक अंदाजातून दिसत असले तरी, गुर्जर, राजपूत, जाट आणि माळी वगळता अन्य ओबीसींचीही मते भाजपच्या पारड्यात गेल्यामुळे भाजपला २०१३ च्या निकालाची पुनरावृत्ती करण्यात यश मिळाल्याचे दिसते.

राजस्थानातील मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्ये भाजपचा ध्रुवीकरणाचा प्रयोगही यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. गुर्जर समाजाचे दिल्लीतील खासदार रमेश बिधुरी, आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा-शर्मा तसेच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हिंदू मतदारांना मुस्लिम मतदारांविरोधात एकत्र येण्याचे आवाहन करणारी भाषणे लक्ष वेधणारी ठरली होती. राजस्थानच्या निवडणुकीवर पाकिस्तानची नजर असल्याचे विधान बिधुरी यांनी जाहीरपणे केले होते. पूर्व राजस्थान तसेच अन्य विभागांतील मतदारसंघांमध्ये हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा फायदा मिळवण्याची रणनिती सुरुवातीपासून अमलात आणली गेली होती. दिल्लीपासून दोन तासांच्या अंतरावर असलेल्या तिजारा मतदारसंघामध्ये बाबा बालकनाथ यांना उमेदवारी देऊन ध्रुवीकरणाचा डाव भाजपने उघडपणे खेळला होता. बालकनाथ हे राजस्थानचे योगी असल्याचा प्रचार केला गेला. त्यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथही आवर्जुन गेले होते.

मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानमध्येही काँग्रेसने प्रामुख्याने राहुल गांधींनी ओबीसी जातगणनेचा प्रचार केला असला तरी, काँग्रेसच्या उमेदवारांनी या मुद्द्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मोदींच्या चेहऱ्यासमोर राहुल गांधींचा ओबीसी प्रचार प्रभावहीन ठरल्याचे निकालांवरून दिसते. राजस्थानमध्ये केवळ अशोक गेहलोत यांच्यामुळे काँग्रेसला पुन्हा सत्तेची संधी असल्याचे चित्र उभे राहिले होते. पक्षाअंतर्गत एकजुटीसाठी अखेरच्या टप्प्यामध्ये खुद्द सोनिया गांधी यांना जयपूरमध्ये ठाण मांडून बसावे लागले होते. दिल्लीतील प्रदूषणामुळे सोनिया गांधी जयपूरला गेल्या होत्या असे सांगितले गेले पण, त्यांना अन्य राज्यातही तात्पुरत्या निवासासाठी जाता आले असते. भाजपने मात्र, काँग्रेसच्या दुहीचा भरपूर प्रचार केला होता. मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह व भाजप विरोधतील नाराजीचा काँग्रेसला फायदा घेता आला नसला तरी, भाजपने राजस्थानमध्ये मात्र गेहलोत सरकारविरोधाचा फायदा उठवत पुन्हा सत्ता मिळवली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

जरांगेचा सरकारवर दबाव : हायकोर्टात याचिका

राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निवृत्त हायकोर्टाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासह आयोगाच्या इतर सदस्यांच्या नियुक्तीला जनहित …

लोकसभा चुनाव कब होंगे? चीफ इलेक्शन कमिश्नर राजीव कुमार ने दिया बड़ा अपडेट

2024 लोकसभा चुनाव को लेकर चुनाव आयोग से तैयारियां पूरी कर ली हैं। मुख्य चुनाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *