Breaking News

सावधान! नागपुरात२४ तासांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट वाढले

2024 ला सुरुवात होण्यापूर्वीच नागपुरात २४ तासांत नवीन ११ करोनाचे रुग्ण आढळले. जिल्ह्यातील सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या एकाच दिवसात दुप्पट झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

नवीन रुग्णांमध्ये पाच अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यात १२ वर्षीय मुलगी, १७ वर्षीय मुलगा, १५ वर्षीय मुलगा, १४ वर्षीय मुलगी, १५ वर्षीय मुलीचा समावेश आहे. ७० वर्षीय महिला, ५९ वर्षीय पुरुष, ७३ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरुष, ७१ वर्षीय पुरुष, ३६ वर्षीय महिलेतही करोनाचे निदान झाले. नवीन रुग्णांमुळे शहरातील सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या आता २२ वर पोहोचली आहे. ग्रामीणलाही करोनाचे २ सक्रिय रुग्ण आहेत. एकूण रुग्णांपैकी चार रुग्ण शहरातील विविध सरकारी व खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहे. परंतु या रुग्णांची प्रकृती स्थिर असून कुणालाही प्राणवायूही लागले नसल्याचा महापालिकेतील आरोग्य विभागाचा दावा आहे. दरम्यान, शुक्रवारीही नागपूर महापालिकेला जनुकीय तपासणीचा अहवाल मिळाला नाही. त्यामुळे एका जनुकीय चाचणीला आठवड्याहून जास्त काळ लागत असल्यास ही चाचणी करून फायदा काय, हा प्रश्न या क्षेत्रातील जाणकार उपस्थित करत आहेत.

४६ करोना चाचणी केंद्र कार्यान्वित
नागपुरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ४६ करोना चाचणी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. या केंद्रांवर सर्दी, खोकला, तापासह करोनाची लक्षणे असलेल्यांनी चाचणी करण्याचे आवाहन नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केले आहे. करोनाच्या विषयावर महापालिकेत एक बैठकही झाली. बैठकीला वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी, डॉ. गोवर्धन नवखरे, एम्स नागपूरच्या डॉ. मीना मिश्रा, नीरीचे डॉ. कृष्णा खैरणार, मेयोचे डॉ. नितीन शेंडे, डॉ. संजय गुज्जनवार आणि इतरही अधिकारी उपस्थित होते. बैठकीत साथरोग अधिकारी डॉ. नवखरे यांनी संगणकीय सादरीकरणातून शहरातील करोनाची माहिती दिली. यावेळी आंचल गोयल म्हणाल्या, करोनाच्या साखळीवर वेळीच नियंत्रण गरजेचे आहे. त्यासाठी संशयितांची चाचणी करून या रुग्णांना विलगीकरणात ठेवण्याची गरज आहे. हे रुग्ण वाढण्याचा धोका बघता रुग्णालयातील विलगीकरण आणि प्राणवायू रुग्णशय्या सज्ज ठेवण्याचेही निर्देश त्यांनी दिले. करोनाच्या नवीन जेएन १ उपप्रकाराला घाबरण्याची गरज नसून वेळीच उपचाराने हा आजार सहज बरा होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

येथे आहेत चाचणी केंद्र
लक्ष्मीनगर झोनमधील खामला, कामगार नगर, जयताळा, सोनेगाव या यू.पी.एच.सी. मध्ये करोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. धरमपेठ झोनमधील फुटाळा, डीक दवाखाना (वनामती), तेलंगखेडी (सुदाम नगरी, वर्मा लेआऊट), के.टी. नगर, हजारी पहाड, दाभा या यू.पी.एच.सी. केंद्रासह हनुमाननगर झोन, धंतोली झोन, नेहरूनगर झोन, गांधीबाग झोन, सतरंजीपुरा झोन, लकडगंज झोन, आशीनगर झोन, मंगळवारी झोनमधीलही बऱ्याच यू.पी.एच.सी. मध्येही करोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

About विश्व भारत

Check Also

नागपूर : कोराडी के शताब्दी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रंगारी की तरफ से तीर्थाटन

नागपूर : कोराडी के शताब्दी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रंगारी की तरफ से तीर्थाटन टेकचंद्र सनोडिया …

नागपूर जिल्ह्यात चोवीस तासांत ६ मुलांचा बुडून मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील रामेटकमधील पेंच नदीच्या कालव्यावर फिरायला गेलेल्या आठ विद्यार्थ्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *