लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने तयारी सुरू केली आहे. दोनच दिवसांपूर्वी पक्षाने १९५ उमेदवारांची यादीही जाहीर केली. येत्या काही दिवसात पुन्हा उर्वरित यादी जाहीर होईल. नेत्यांचे दौरे वाढले आहे. पाचच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला भेट दिली होती. तेथे जाण्यासाठी ते प्रथम नागपूला आले होते व सोमवारी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपूर विमानतळावर सकाळी आगमन झाले. येथून ते तेलंगणाला गेले. या दोन्ही वेळा त्यांच्या स्वागताला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
पंतप्रधान सोमवारी नागपूरला येणार ही माहिती विमानतळावर लावण्यात आलेल्या सुरक्षा बंदोबस्तावरून काही दिवसांपूर्वी प्राप्त झाली होती. आजच भाजयुमोचा राष्ट्रीय मेळावा नागपुरात होणार असल्याने ते त्या कार्यक्रमाला येणार अशी चर्चा lराजकीय वर्तुळात होती. मात्र रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबाबत अधिकृत माहिती भाजप कार्यकर्त्यांना मिळाली. पंतप्रधान नागपूरमार्गे तेलंगणात जाणार व त्यापूर्वी ते विमानतळावर नागपूर भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार,असे सांगण्यात आले.
मोदी सकाळी दहाच्या सुमारास नागपूर विमानतळावर आले. त्यांचे स्वागत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. यावेळी वरिष्ठ अधिकारी व भाजप नेते उपस्थित होते. पाच दिवसांत दोन वेळा गडकरी यांना मोदींच्या स्वागताची संधी मिळाली. भाजपने जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत गडकरी यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. त्यातच आज पुन्हा मोदी – गडकरी यांची पाच दिवसांत दुसऱ्यांदा भेट झाली. दोन्ही नेत्यांनी परस्परांशी संवाद साधला.