या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. पोषक आहार आणि नियमित व्यायाम करत नसल्यामुळे आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. लॅन्सेट ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित केलेल्या माहितीनुसार भारताच्या एकूण प्रौढ भारतीय लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या निरोगी नाही. यामध्ये ५७ टक्के स्त्रिया आणि ४२ टक्के पुरुष तंदुरुस्त नाही. विशेष म्हणजे या आकडेवारीत स्त्रियांची संख्या जास्त आहे. २००० मध्ये २२.३ टक्के भारतीय प्रौढ लोक निरोगी नव्हते तर २०२२ मध्ये हा आकडा ४९.४ टक्क्यापर्यंत वाढला आहे. द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने या विषयी सविस्तर माहिती सांगितली आहे.
ही आकडेवारी का महत्त्वाची आहे?
जागतिक आरोग्य संघटना (WHO) सांगते की, प्रौढ वर्गातील लोकांनी कमीत कमी १५० ते ३०० मिनिटे शारीरिक हालचाल करणारे व्यायाम करावेत. जर तुम्ही १५० मिनिटेसुद्धा शारीरिक हालचाल करणारे व्यायाम करत नाही आणि ७५ मिनिटे तीव्र स्वरुपाचे व्यायाम करत नाही, तर तुम्ही शारीरिकदृष्ट्या निरोगी नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, अशा प्रौढ लोकांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, टाइप २ मधुमेह, स्मृतिभ्रंश, कोलन आणि स्तनाच्या कर्करोगांचा धोका जास्त असतो.
शारीरिक व्यायाम न करणाऱ्या प्रौढ लोकांची आकडेवारी लक्षात घेता, १९५ देशांमध्ये भारत हा १२ व्या क्रमांकावर आहे. जगभरात जवळपास एक तृतीयांश म्हणजेच ३१ टक्के प्रौढ लोक २०२२ मध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार शारीरिक व्यायाम करत नाहीत. “२०१० च्या आकडेवारीचा विचार करता २०२२ च्या आकडेवारीमध्ये ५ टक्के वाढ झाली आहे”, असे जागतिक आरोग्य संघटनेतील हेल्थ प्रोमोशनचे संचालक डॉ. रुडीगर क्रेच सांगतात.जास्त उत्पन्न असलेल्या आशिया- पॅसिफिकमध्ये ४८ टक्के लोक आणि दक्षिण आशियामध्ये ४५ टक्के लोक तंदुरुस्त नाही. जास्त उत्पन्न असलेल्या पाश्चात्य देशांमध्ये याचे प्रमाण २८ ते १४ टक्केदरम्यान आहे.“कामाची पद्धत, जसे की तासन् तास बसून काम करत असल्यामुळे, वातावरणातील बदल, स्क्रीनचा अधिक वापर इत्यादी कारणांमुळे शरीरावर दुष्परिणाम होत आहे”, असे डॉ. क्रेच पुढे सांगतात.
हेही वाचा : ‘मुंज्या’तील पम्मी म्हणजे मोना सिंगने १५ किलो वजन कमी वेळात घटवलं! वजन कमी करताना व्यायाम व झोप किती असावी? डॉक्टरांकडून ऐका
भारतातील आकडेवारी ही चिंतेची बाब
भारतातील आकडेवारी हा चिंतेचा विषय आहे, कारण भारतातील लोक इतर देशांच्या तुलनेत कमीत कमी एक दशकपूर्वी हृदयाशी संबंधित आणि मधुमेहासारखे आजारांसाठी अनुवांशिकदृष्ट्या तयार असतात. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. के. श्रीनाथ रेड्डी सांगतात, “व्यायामाच्या अभावामुळे आपण आरोग्याच्या समस्या वाढवत आहोत.”
डॉ. रेड्डी पुढे सांगतात, “शारीरिक हालचाली किंवा व्यायाम करण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी खालील गोष्टी करणे गरजेचे आहे.
१. हृदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा आणि काही विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करणे.२. मानसिक आरोग्य सुदृढ ठेवणे.३. रोगप्रतिकारशक्ती वाढविणे.
जगात विशेषतः दक्षिण आशियामध्ये शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे लोकांमध्ये शारीरिक हालचालींचे प्रमाण कमी झाले आहे.”
जागतिक तापमान वाढीमुळे हवामानात होणारा बदलांचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो, अशात निरोगी राहणे हे एक आव्हान आहे. डॉ. रेड्डी पुढे सांगतात,
महिला तंदुरुस्त नाही ही चिंताजनक बाब आहे
डॉ. रेड्डी सांगतात की, भारतातील अनेक अभ्यासांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, एकूण लोकसंख्येचा विचार केला तर भारतीय लोक शारीरिक व्यायाम किंवा शारीरिक हालचाली कमी करत असल्याचे दिसून आले आहे. विशेषत: भारतीय स्त्रिया; कारण आपल्या देशातील स्त्रियांना वाटते की घरगुती कामे करणे हा एक चांगला शारीरिक व्यायाम आहे.
डॉ. रेड्डी पुढे सांगतात, “सर्व वयोगटात जरी याचे प्रमाण दिसत असले, तरी मध्यमवयीन शहरी महिलांमध्ये शारीरिक हालचालींची कमतरता जाणवते. मागील काही वर्षांमध्ये भारतात फिट इंडिया, लेट्स मुव्ह इंडिया सारखे उपक्रम लॉंच करण्यात आले आहेत तरीसुद्धा शाळा, कामाच्या ठिकाणी आणि समुदायांमध्ये निरोगी आरोग्यासाठी जागरुकता पसरवणे गरजेचे आहे.”
भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तानमधील महिलांमध्ये शारीरिक हालचाल किंवा व्यायामाचा अभाव ही एक चिंतेची बाब आहे. या महिला पुरुषांपेक्षा १४-२० टक्क्यांनी मागे आहेत, तर आपल्या शेजारच्या देशातील महिला म्हणजेच बांगलादेश, भूतान आणि नेपाळमधील महिला अधिक शारीरिकदृष्ट्या सक्रिय आहेत. २०१० ते २०३० दरम्यान महिलांमध्ये हा आकडा १५ टक्क्यांनी कमी करायचे ध्येय आहे.
जागतिक आरोग्य संघटना युनिटचे प्रमुख डॉ. फिओना बुल आणि इपिडेमियोलॉजिस्ट तज्ज्ञ डॉ. टेसा स्ट्रेन सांगतात, “महिलांमध्ये शारीरिक व्यायाम किंवा हालचाल कमी होण्यामागील कारण म्हणजे त्यांचे घरातील कर्तव्ये. त्यांची इतरांप्रती काळजी घेण्याच्या भूमिकेमुळे ते अनेकदा स्वत:कडे दुर्लक्ष करतात. त्यांना स्वत:ची काळजी घेण्यास पुरेसा वेळ मिळत नाही आणि यामुळे त्यांना शारीरिक थकवा जाणवतो.”