तरुणीची छेडखानी केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक आरोपीच्या घरी गेले. आरोपी बापलेकांनी दारात पोलीस दिसताच अश्लील शिवीगाळ करून पोलिसांच्या अंगावर ग्रेडडेन जातीचा कुत्रा सोडला. कुत्र्याने एका पोलीस कर्मचाऱ्यांचे लचके तोडले. हे दृष्य बघून अन्य पोलिसांनी घटनास्थळावरुन पळ काढला. शेवटी पोलिसांनी कुत्र्याच्या तावडीतून सुटल्यानंतर बापलेकांना अटक केली. अंकुश उर्फ गुड्डू पिंटू बागडी (३७) आरोपी मुलाचे तर पिंटू नंदलालजी बागडी (६५, रा. ईतवारी, सराफा मार्केट, वैशाली साडी सेंटर समोर, नागपूर) असे आरोपी वडिलांचे नाव आहे.
अंकुश बागडी हा विकृत स्वभावाचा आहे. त्याने एका तरुणीसोबत अश्लील चाळे केले. त्या तरुणीने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी आरोपी अंकुशला पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितले. मात्र, तो ठाण्यात आला नसल्यामुळे मंगळवारी रात्री १०.३० वाजता पोलीस हवालदार संजय रामलाल शाहू आणि त्यांचा एक सहकारी पोलीस कर्मचारी हे अंकुशच्या घरापुढे आले.
हेही वाचा : मूल होत नसल्याने पत्नीचा खून केला आणि मृतदेहाजवळ तब्बल सहा तास…
त्यांनी अंकुशला आवाज दिला. आवाज ऐकून अंकुश आक्रमक दिसणारा पाळीव कुत्रा घेऊन घराबाहेर आला. हवालदार संजय यांनी आरोपीला ओळख दिली आणि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. पोलीस ठाण्यात सोबत येण्यास सांगितले. त्याला अटकेची भीती वाटली. त्यामुळे वडिलाला बोलावून घेतले.
आवाज ऐकून अंकुशचे वडील पिंटू नंदलालजी बागडी (७३) घराबाहेर आले. त्यांनीही पोलिसांना अटकाव करत शिवीगाळ केली. दरम्यान, हवालदाराने वडील पिंटू बागडी यांना बाजुला होण्यास सांगितले. अंकुशला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. अंकुशने त्याचा पाळीव कुत्रा हवालदाराच्या अंगावर सोडला.
आक्रमक कुत्र्याने हवालदाराच्या अंगावर उडी घेतली. त्यामुळे घाबरेल्या हवालदाराने सहकारी कर्मचाऱ्यासह तेथून पळ काढला. मात्र, कुत्र्याने हवालदाराचा पाठलाग करून त्यांचा लचका तोडला. कुत्र्याने हवालदाराच्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. शाहु यांच्यासोबत असलेल्या पोलीस अंमलदाराने हवालदाराला वाचविण्याकरिता कुत्र्यावर लाठी उगारली. मात्र, कुत्र्याने दुसऱ्याही पोलिसाच्या अंगावर धाव घेतली. कुत्र्याची आक्रमकता बघून दुसरा पोलीस कर्मचारी पळून गेला. काही वेळानंतर दोघेही परत आले आणि त्यांनी नगारिकांच्या मदतीने बापलेकाला ताब्यात घेतले. संजय शाहू यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. या प्रकरणी संजय शाहू यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक मादेवार यांनी आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करत आरोपी बापलेकाला अटक केली.