Breaking News

विधानसभा निवडणूक असताना उपजिल्हाधिकारी फरार

बेहिशेबी मालमत्ता बाळगल्यामुळे धाराशिवच्या निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी शिरीष यादव यांच्या विरोधात पुणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एक कोटी ३८ लाख रूपयांची बेहिशेबी मालमत्ता निदर्शनास आली असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीत नोंदविण्यात आले आहे. शुक्रवारी गुन्हा नोंद झाल्यापासून धाराशिवच्या निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी शिरीष यादव वॉन्टेड आहेत. विधानसभा निवडणूक २८ दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले यांच्याकडे सध्या निवडणुकीचा अतिरिक्त पदभार सुपूर्द करण्यात आला आहे.

 

मंगळवारी विधानसभा निवडणूक नामनिर्देशनपत्र विक्री आणि दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. तत्पूर्वी शुक्रवारपासून निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी पदाचा तात्पुरता पदभार असलेले शिरीष यादव सध्या फरार आहेत. त्यांचा पदभार मांजरा प्रकल्प-२ चे भूसंपादन अधिकारी उदयसिंह भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. तर अपर जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

 

शिरीष यादव यांच्यासह त्यांच्या पत्नीविरूध्दही बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. शासकीय सेवा कालावधीत मिळविलेल्या उत्पन्नापेक्षा जास्तीचे उत्पन्न त्यांनी बाळगले असल्याचे एसीबीच्या तक्रारीत समोर आले आहे. बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती. उत्पन्नाबाबतचा समाधानकारक खुलासा ते देवू शकले नाहीत. त्यामुळे यादव दाम्पत्याच्या विरोधात १७ ऑक्टोबर रोजी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केला आहे. तेंव्हापासून ते फरार आहेत.

 

रजेवर असल्यामुळे अतिरिक्त पदभार ः जिल्हाधिकारी

निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी शिरीष यादव यांच्याकडे अपर जिल्हाधिकारी पदाचाही अतिरिक्त पदभार होता. त्यांनी रजेवर असल्याचे कळविल्यामुळे अपर जिल्हाधिकारी म्हणून संतोष भोर यांच्याकडे पदभार सोपविला आहे. तर निवडणूक विभागाच्या कामकाजासाठी उदयसिंह भोसले यांना निवडणूक विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. यादव यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती माध्यमांतूनच समजली. गुन्हा दाखल झाल्याचे अधिकृत पत्र प्राप्त झाल्यानंतर योग्य ती प्रशासकीय कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले.

तपास सुरू आहे – उपाधीक्षक कटके

मागील नऊ वर्षांपासून शिरीष यादव यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचा छडा लावण्याचे काम सुरू आहे. काही महत्वपूर्ण धागेदोरे समोर आल्यानंतर शुक्रवारी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एकाच दिवशी तीन कारवाया झाल्यामुळे धाराशिवचे जिल्हाधिकारी यांच्याशी तातडीने पत्रव्यवहार झाला नाही. या कारवाईबद्दल मंगळवारी रितसर पत्र व्यवहार केला आहे आणि पुढील तपास सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी तथा पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कटके यांनी दिली.

About विश्व भारत

Check Also

PWD जांच करेगी : IAS अधिकारी की फ‍िर बढ़ी टेंशन 

PWD जांच करेगी : IAS अधिकारी की फ‍िर बढ़ी टेंशन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांची मुंबईवारी

अर्थ राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशीष जयस्वाल यांनी गडचिरोलीत औषध व वैद्यकीय साहित्य खरेदीत कोट्यवधींचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *