Breaking News

वाघ पाहण्याची उत्सुकता अन् पोलिसांचा लाठीचार्ज

किटाडी ते मांगली (बांध) या रस्त्यावरील शेतशिवारातलगत किटाडीपासून पुढे जवळपास दोन किलोमीटर अंतरावर बुधवारी सायंकाळी वाघ असल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी वाघ पाहण्यासाठी एकच गर्दी केली.गर्दीला पांगविण्यासाठी वन विभागाने पोलीसाना बोलविले.भंडारा पोलीसांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.

 

त्यात एक विद्यार्थी जखमी झाला. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी पोलिसांवर हल्लाबोल करीत धक्काबुक्की केली. या प्रकारानंतर बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.लाखनी तालुक्यातील किटाडी जंगल परिसरात व शेतशिवारात मागील महिन्याभरापासून पट्टेदार वाघाचा मुक्तसंचार सुरू आहे. गावकऱ्यांना दररोज या वाघाचे दर्शन होत असल्याने गावात भीतीचे सावट पसरले आहे.

 

त्यातच बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास किटाडीपासून पुढे जवळपास दोन किलोमीटर अंतरावर वाघ असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. वाघ बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.

 

ही माहिती मिळताच लाखनीचे ठाणेदार सोनवणे आपल्या चमूसह तसेच वन विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले. गर्दीच्या आवाजाने वाघ चवताळून जाऊ नये यासाठी वन विभाग खबरदारी घेत होता मात्र. एवढ्या मोठ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे वन विभागाला अशक्य झाले. अखेर गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. गर्दीच्या कल्लोळने वाघ चवताळण्याची भीती असल्याने पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. यात एका १४ वर्षीय विद्यार्थ्यांला जबर मार बसला. वृषभ विनोद राऊत (रा. किटाडी) असे जखमी विद्यार्थ्यांचे नाव आहे.

 

पोलिसांच्या या लाठीचार्जमुळे संतप्त जमावाने पोलिसांनाच धक्काबुक्की केली. बराच वेळ या ठिकाणी तणावाचे वातावरण होते.जखमी विद्यार्थ्याच्या वडिलांनी लाखनीच्या ठाणेदाराच्या विरोधात पालांदूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जखमीवर पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

About विश्व भारत

Check Also

ताडोबातील वाघांच्या अभयारण्यावर हत्तीचे अतिक्रमण

ओरिसातून स्थलांतरित होणाऱ्या रानटी हत्तींनी महाराष्ट्रातील वन खात्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. याआधी साधारणत: चार …

आजपासून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यभरात येत्या तीन ते चार दिवस वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *