विश्व हिंदू परिषदेच्या जवळपास ३० ते ३५ कार्यकर्त्यांनी दुपारी एक वाजता महाल झेंडा चौकात औरंगजेबाचे छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर तयार केली. औरंगजेबाच्या छायाचित्राला चपलेने मारून निषेध व्यक्त केला.
दुपारी दोन वाजता : औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरेला पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या कबरेवर एका धर्मासाठी पवित्र मानण्यात येणारी हिरवी चादर टाकण्यात आली होती. त्यावर कुराणाच्या आयात लिहिलेल्या होत्या. ती चादर पेटवल्याची चर्चा सर्वत्र पसरली.
– दुपारी चारपर्यंत विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते महाल चौकात उपस्थित होते
– विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पाच वाजता प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना फोन करुन बोलावले, परंतु, पोर्टलच्या पत्रकारांशिवाय कुणीही तिकडे फिरकले नाही.
– औरंगजेबाची प्रतिकात्मक कबरेवरील हिरव्या रंगाची चादर जाळल्याचे काही छायाचित्र विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केले.
– रात्री सात वाजता विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नारेबाजी केली.
– रात्री साडेसात वाजता पोलिसांनी त्यांना आंदोलन बंद करण्यास भाग पाडले.
– रात्री आठ वाजता चिटणीस पार्क चौकाकडून एक गट आला. त्यांनी हिरव्या चादरीबाबत आक्षेप घेतला. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव करीत पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला.
– रात्री साडेआठ वाजता दोन्ही धार्मिक गटांनी एकमेकांच्या विरोधात नारेबाजी केली. त्यामुळे वाद चिघळला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दुकाने बंद करण्यास भाग पाडले.
– दुकाने बंद केल्यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी जमावावर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या.
– दोन्ही गटातील युवकांनी दगडफेक करणे सुरु केले. काहींनी जाळपोळ केली.
– रात्री ८.४० पासून वाजतापासून दंगल उसळली.
– रात्री नऊ वाजतापासून पोलिसांनी ‘कोम्बींग ऑपरेशन’ राबवून धरपकड सुरु केली.
– रात्री १० वाजतापर्यंत २० जण ताब्यात घेतले आणि धरपकड सुरुच आहे.
– एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी जखमी, त्यांच्यावर उपचार सुरु
औरंगजेबाच्या कबरीभोवती सुरू असलेल्या वादावरून मंगळवारी संध्याकाळी नागपूरच्या महाल परिसरात दोन गटांमध्ये संघर्ष झाल्याने तणाव वाढला आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी काही संघटनांनी केलेल्या आंदोलनादरम्यान मुस्लिम समुदायाचा पवित्र ग्रंथ जाळल्याच्या अफवांमुळे पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, ज्यामध्ये दोन जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मख्यमंत्र्यांकडून शांततेचे आवाहन
मुख्यमंत्री कार्यालयानुसार, “नागपूरच्या महाल भागात दगडफेक आणि तणावपूर्ण परिस्थितीनंतर पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत आहे. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आम्ही सतत पोलिस प्रशासनाच्या संपर्कात आहोत आणि नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि सहकार्यशील शहर आहे. हीच नागपूरची परंपरा आहे. अशा परिस्थितीत, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करा.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नागपूरकरांना शांततेचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
चिटणीस पार्क आणि महाल भागात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. दुपारी उशिरा कोतवाली आणि गणेशपेठ येथेही हिंसाचार पसरल्याची माहिती मिळाली असल्याचे, अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाहनांच्या काचा फोडल्या
काही समाजकंटकांनी पोलिसांविरुद्ध निदर्शने करीत रस्त्यावरी वाहनांची तोडफोड केली. ई रिक्षा आणि ऑटो रस्त्यावर उलटवून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर उभ्या दुचाकींचीसुद्धा तोडफोड केली. यामध्ये सर्वाधिक नुकसान ई रिक्षाचे झाले आहे. पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला असून, पोलीस आयुक्त,सहआयुक्तांसह सर्वच अधिकारी महालमध्ये दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
आज सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान शिवाजी चौकाजवळ एका गटाने घोषणाबाजी सुरू केली. यामध्ये त्यांचा दुपारी विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनासंदर्भात त्यांचा रोष होता, घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही घोषणाबाजीला सुरुवात केल्याने वाद वाढला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना पांगवले. मात्र, पुढे चिटणीस पार्ककडील भालदारपुरा दिशेने पोलिसांवर दगडफेक सुरु झाली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी अश्रु धुराच्या नळकांड्या फोडल्या.