खास मांसासाठी कुक्कुटपालन केंद्रात वाढवल्या जाणाऱ्या ब्रॉयलर कोंबड्या अलीकडे मुबलक प्रमाणात व कमी किंमतीत मिळत असल्या, तरी ग्राहकांमध्ये नैसर्गिक व रसायनमुक्त अन्न पदार्थांची मागणी वाढल्यामुळे गावरान कोंबड्यांनाही शहरातील आठवडे बाजारात आता चांगली मागणी आहे. किबहुना, गावरान कोंबड्या बोकडाच्या मटनापेक्षाही जास्त दराने विकल्या जात आहेत.
ग्रामीण भागात रोजचा घर खर्च वरचेवर भागविण्यासाठी परसातील कुक्कुटपालन अनेकजण करताना दिसून येतात. त्यापुढे जाऊन केवळ व्यावसायिक दृष्टीकोनातून गावरान कोंबड्या सांभाळण्याकडेही काही शेतकऱ्यांनी आता भर दिला आहे. ग्राहकांचा रसायनमुक्त अन्न पदार्थांकडे कल वाढल्यामुळे नैसर्गिक वातावरणात वाढलेल्या गावरान कोंबड्यांना चांगला दर परिणामी बाजारात मिळत आहे. ब्रॉयलर कोंबड्यांच्या तुलनेत गावरान कोंबड्यांचे मांस अधिक रूचकर, कमी चरबी असलेले तसेच आरोग्यदायी मानले जाते. त्यामुळेही गावरान कोंबडीचे मांस अलीकडे बोकडाच्या मटनापेक्षाही महाग विकले जात आहे. पूर्वी गावरान कोंबडी जेमतेम १०० रुपये आणि कोंबडा २०० रुपयांना विकला जात असे. मात्र, मागणी वाढल्यानंतर आता पाऊण किलो वजनाच्या एका जिवंत कोंबडीला ३०० ते ४०० तसेच जिवंत कोंबड्यास ५०० ते ६०० रुपयांपर्यंतचा दर बाजारात मिळू लागला आहे. आठवड्यातून एकदा शनिवारी शहरात भरणाऱ्या कोंबडी बाजारात, गावागावात त्याचप्रमाणे मांसाहारी हॉटेल्समध्ये गावरान कोंबड्यांना असलेल्या मागणीत दिवसेंदिवस वाढच होत आहे.
गावरान कोंबड्या फायदेशीर कशा ?
गावरान कोंबड्या सांभाळण्यासाठी खास शेडची आवश्यकता नसते. परसात मुक्तपणे फिरणाऱ्या कोंबड्या वाया जाणारा भाजीपाला, निवडलेले धान्य खाऊन सुद्धा चांगल्या प्रकारे जगू शकतात. साधारण चार ते पाच महिन्यात गावरान कोंबडी पाऊण ते एक किलो वजनाची सहजपणे होते. त्यानंतर अंडी देण्यास सुरूवात करते. गावरान कोंबडी पालनासाठी फार खर्च येत नसल्याने विक्रीतून चांगला नफा संबंधितांना मिळतो.
बाजारात पूर्वी गावरान कोंबड्यांची आवक भरपूर असतानाही किंमती कमीच असायच्या. त्यातुलनेत आता मागणी अधिक आणि आवक कमी अशी परिस्थिती असली तरी गावरान कोंबड्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, असे चिकन मटण विक्रेते सांगतात.