सर्वत्र वेगाने विकास होत आहे. देशाच्या विविध भागात अनेक विकासकामे सुरू आहेत. मात्र या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचा कायम आरोप केला जातो. यासाठी मुख्यत: कंत्राटदारांना दोष दिले जाते. कंत्राटदार योग्यप्रकारे कार्य करत नाही, निकृष्ट साहित्याचा वापर होतो, असे अनेक आरोप होतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही अनेकदा कंत्राटदारावरच निकृष्ट कामाचे खापर फोडले आहे.
उच्च न्यायालयानेही अनेक प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांना कामचुकार कंत्राटदाराचा बचाव करण्यासाठी खडेबोल सुनावले आहे. न्यायालयाने अनेक निकालांमध्ये कंत्राटदांराना यासाठी दोषी असल्याचे सांगितले आहे. मात्र अशा स्थितीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक वेगळे दृश्य बघायला मिळाले. उच्च न्यायालयात केलेल्या ‘वर्ल्ड क्लास’ कामासाठी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी थेट कंत्राटदाराचा सत्कार केला.
गवईंनी उच्च न्यायालयात झालेल्या जागतिक दर्जाच्या कामासाठी कंत्राटदार अखिल अतुलकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा गौरव केला. हा अनोखा सत्कार सोहळा चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला.
व्हिक्टोरियन स्थापत्यशैलीचे काम
उच्च न्यायालयात न्यायालयीन कक्ष, न्यायमूर्तींची दालने यांचे नूतनीकरण करण्यात आले. या नूतनीकरणात व्हिक्टोरियन स्थापत्यशैलीचा आणि पुरातन सौंदर्याचा ठसा जपण्यात आला आहे. उच्च न्यायालयाचा वारसा प्रतिबिंबित करण्यासाठी लाकडी फिटिंग्सचा वापर करण्यात आला. यासह ऑनलाईन सुनावणीसाठी टीव्ही स्क्रीन, मायक्रोफोन यासह विविध आधुनिक सुविधाही प्रदान करण्यात आल्या आहेत. याशिवाय शासकीय अधिवक्तांसाठी नवे अत्याधुनिक कार्यालयही तयार केले आहे. यांचे उद्घाटन माजी सरन्यायाधीश भूषण गवईं यांच्या हस्ते करण्यात आले.
गवईंनी सर्व कामांची पाहणी करत गौरवोद्गार काढले. यावेळी हे काम करणारे कंत्राटदार अखिल अतुलकर, प्रकल्प अधिकारी वरूण सहारे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संभाजी माने, अधीक्षक अभियंता जर्नादन भानुसे, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत राऊलकर, उपविभागीय अभियंता प्रशांत पुषतोडे, शाखा अभियंता किशोर रामटेके यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या हस्ताक्षराचे प्रशंसापत्रही देण्यात आले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या.नितीन सांबरे, नागपूर खंडपीठातील न्या.अनिल पानसरे, न्या.मुकुलिका जवळकर, न्या.उर्मिला जोशी-फाळके, न्या.राज वाकोडे, न्या.प्रफुल्ल खुबाळकर, मुख्य सरकारी वकील ॲड.देवेंद्र चव्हाण यांच्यासह विधी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, उच्च न्यायालय परिसरात येत्या काळात अनेक कार्य प्रस्तावित आहेत. प्रस्तावित कार्यही जागतिक दर्जाचे व्हावे अशी अपेक्षा गवईंनी व्यक्त केली.
विश्वभारत News Website