राज्याच्या उपराजधानीत प्रेमप्रकरणातून घडणाऱ्या गुन्ह्यांची मालिका सुरूच असून, कळमेश्वर रोडवरील फेटरी परिसरातील ओयो हॉटेलमध्ये तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
रुचिता भांगे असे मृत तरुणीचे नाव असून, या घटनेने संपूर्ण नागपूर शहर हादरून गेले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रुचिता भांगे आणि तिचा प्रियकर हे दोघे ओयो हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. या दरम्यान, कोणत्या तरी कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. क्षणाक्षणाला वाढत गेला. प्रथम हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले. त्यानंतर काही वेळाने दोघांमध्ये पुन्हा वाद वाढला. त्याचे रूपांतर हिंसक कृत्यात झाले. संतापाच्या भरात प्रियकराने चाकूने रुचिताच्या गळ्यावर वार केला. या गंभीर हल्ल्यात रुचिता रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला.
घटना घडताच आरोपी प्रियकराने हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, हॉटेलमधील कर्मचारी, व्यवस्थापन तसेच परिसरातील नागरिकांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा कसून शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अलीकडच्या काळात प्रेमसंबंधांतून होणाऱ्या हिंसक घटनांमध्ये वाढ होत असल्याने, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून या दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान पोलीस तपासात या प्रकरणात खुनाचे इतर काही करण आहे काय? हे स्पष्ट होईल.
गोधणी परिसरात एकतर्फी प्रेमातून झाली होती हत्या…
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोधणी परिसरातही अशीच धक्कादायक घटना समोर आली होती. एकतर्फी प्रेमातून २३ वर्षीय तरुणी प्राची खापेकर हिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. विवाहित शेजारी शेखर ढोरे (वय ३८) याने तरुणीचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह पंख्याला लटकावून आत्महत्येचा बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता; मात्र शवविच्छेदन अहवालातून खुनाचा प्रकार स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
विश्वभारत News Website