साधारण: विवाहानंतर कलाकारांचे करिअर समाप्त होते, असा अनुभव अनेकांनी घेतला आहे. विशेषत: महिला कलाकारांना आपला अभिनय सोडून घर, मुले सांभाळावे लागते. त्यामुळे अंगी असलेला कसलेला अभिनयही सुप्तावस्थेत जातो. मौसमी यांनी मात्र विवाहानंतर आपले अभिनय क्षेत्र सोडले नाही आणि त्यांना चांगल्या कथांचे चित्रपट मिळाले.
ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी [Mausami Chatarji] यांची ६०-७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गणना व्हायची. हिंदीबरोबरच बंगाली चित्रपटामध्ये आपले नशीब आजमावलेल्या मौसमी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली.
मौसमी यांचा जन्म २६ एप्रिल रोजी कोलकाता येथे झाला. मौसमी यांनी अगदी कमी वयात चित्रपटांत काम सुरू केले होते. खरं तर त्या लग्नानंतरच एक मुख्य अभिनेत्री म्हणून समोर आली. लग्नानंतर अभिनेत्री शक्यतो चित्रपटात यायच्या नाहीत; परंतु, मौसमी यांनी या गोष्टीला छेद दिला. लग्नानंतरही त्या एक यशस्वी अभिनेत्री ठरल्या.
मौसमी यांचे खरे नाव इंदिरा चॅटर्जी आहे. बंगाली चित्रपट दिग्दर्शक तरुण मजूमदार यांनी त्यांचे नाव बदलून मौसमी असे केले होते. १६ वर्षांच्या असताना पहिला बंगला चित्रपट ‘बालिका बधू’ केला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर त्यांनी ‘अनुराग’ (१९७२) हा पहिला हिंदी चित्रपट स्वीकारला. अगदी कमी वयात त्यांनी निर्माते जयंत मुखर्जी यांच्याशी विवाह केला. १८ वर्षांच्या असताना त्या आई बनल्या. त्यांना मेघा आणि पायल अशा दोन मुली आहेत.
एका मुलाखतीदरम्यान, मौसमी म्हणाल्या होत्या, रोटी कपडा और मकान (१९७४) च्या शूटिंगवेळी मी खूप कठीण परिस्थितीतून गेले. यामध्ये माझी रेप सरव्हायवर तुलसीची भूमिका होती. या शूटिंगवेळी कठीण परिस्थितीला सामोरे गेले. यावेळी माझ्यासोबत एक दुर्घटना घडली होती. ज्यामुळे मी खूपच घाबरले होते. मौसमी यांच्यावर शूटवेळी खूप सारे धान्याचे पीठ पडले होते. हे पाहून त्या रडत होत्या. त्यावेळी त्या प्रेग्नेंट होत्या. त्या खाली पडल्याने रक्तस्त्राव झाल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने त्यांच्या बाळाला काहीही दुखापत झाली नाही. इतकेच नाही तर मौसमी यांचे केस खूप मोठे होते. शूटिंगवेळी खूप सारे पीठ त्यांच्या केसांत अडकले होते. शूटिंगनंतर त्या रात्री साडेदहा वाजता घरी पोहोचल्या आणि केसातून पीठ काढता काढता रात्रीचे दोन वाजले होते.
मौसमी यांनी संजीव कुमार, जितेंद्र, राजेश खन्ना, शशी कपूर, अमिताभ बच्चन यासारख्या अभिनेत्यांसोबत काम केले; परंतु त्यांची विनोद मेहरा यांच्याशी जोडी प्रेक्षकांना खूपच भावली.
मौसमी यांच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये कच्चे धागे, जहरीला इंसान, संतान, जल्लाद, करीब, जिंदगी रॉक्स, स्वर्ग नरक, फु ल खिले है गुलशन गुलशन, माँग भरो सजना, ज्योती बने ज्वाला, दासी, अंगूर, घर एक मंदिर, घायल आवाज, घायल, ना तुम जानों न हम, पीकू आणि आ अब लौट चलें यासारख्या चित्रपटातील मौसमी यांच्या अभिनयाने खूप कौतुक करण्यात आले. रोटी कपडा और मकानसाठी त्यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून पारितोषिक मिळाले होते.