बेरोजगार उमेदवारांनी वैफल्यग्रस्त परिस्थितीतून बाहेर यावे
: अमोल यावलीकर
37 उमेदवारांनी घेतला वेबिनारचा लाभ
चंद्रपूर दि. 30 एप्रिल: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि. 28 एप्रिल 2021 रोजी वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जवळपास 37 उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता प्रत्येकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच बेरोजगार उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगारबाबत अनिश्चितता असणे स्वाभाविक आहे. परंतु उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे उमेदवारांना वैफल्यग्रस्त होऊ नये व आलेल्या संकटांना योद्ध्याप्रमाणे सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असे मार्गदर्शन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले.ऑनलाइन वेबिनार प्रसंगी ते बोलत होते.
जातीनिहाय, विविध आर्थिक विकास महामंडळाच्या स्वयंरोजगाराकरिता कर्ज योजना, स्पर्धा परिक्षेची तयारी व समाज कल्याण विभागाच्या योजनांबाबत वेबिनारच्या माध्यमातून उमेदवारांना मार्गदर्शन केले.
उमेदवारांच्या अंगी उपजत कौशल्याच्या विकास करून त्यामधून अर्थाजन करण्याकरिता केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त, भैय्याजी येरमे यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली. तर पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रम 3.0,प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान, रोजगार मेळावा या संदर्भात सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांनी आदिवासी उमेदवारांना केंद्र व अभ्यासिकांबाबत योग्य माहिती देत मार्गदर्शन केले. कौशल्य विकास विभाग, चंदपूर तर्फे आयोजित वेबिनारचा बेरोजगार उमेदवार, कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेचे संचालक व प्रशिक्षणार्थी, बचत गटाच्या महिला उमेदवार तसेच अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधीचा लाभ घेतला.
सहायक आयुक्त, अमोल यावलीकर यांनी बेरोजगार उमेदवारांना येणाऱ्या अडचणी व प्रश्नाबाबत समाधानकारक उत्तरे दिली. ऑनलाईन वेबिनारमध्ये सहभागी होत मार्गदर्शन घेतलेले व उपस्थिती नोंदविलेल्या उमेदवारांचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी शैलेश भगत यांनी आभार व्यक्त केले.