कोरोनाच्या तिसर्या लाटेचा सर्वाधिक फटका चिमुरड्यांना?
– तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
मुंबई-
कोरोनाच्या तिसर्या वाटेचा सर्वाधिक फटका चिमुरड्यांना बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. देशभरात बाधितांच्या उपचारांची स्थिती पाहता कोरोनाचा संसर्ग लहान मुलांना झाल्यास त्यांच्यावरील उपचारासाठी आपण सक्षम आहोत का, असा प्रश्न आता आरोग्य यंत्रणेसमोर आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत लहान मुलांमध्येही कोरोना संक्रमणाचे प्रमाण पहायला मिळाले आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबईत 1 महिन्यांच्या बाळापासून ते 30 वर्षांच्या तरुणांचे कोरोनामुळे प्राण गेले आहे. त्यातच आता तिसर्या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लहान मुलांचे लसीकरणही झालेले नाही. अद्याप अशी लस देखील निर्माण झालेली नाही. यासह, रेमडेसिवीर आणि इतर औषधेही लहान मुलांना द्यावी की नाहीत याबाबत स्पष्टता नाही. इंडियन अकॅडमी ऑफ पेडिऍट्रिक्सनेही लहान मुलांमधील वाढत्या संसर्गाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
देशभरात 10 वर्षांखालील लहान मुलांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. खाटा, प्राणवायू, रेमडेसिवीरच्या तुटवड्याने दुसर्या लाटेत तोंडचे पाणी पळाले आहे. जर लहान मुलांमध्ये हा संसर्ग वेगाने पसरला, तर आताच त्याची तयारी व्हायला हवी, असेही तज्ज्ञांचे मत आहे.
महाराष्ट्रात 1 मार्च ते 4 एप्रिल 2021 दरम्यान एकूण 60, 684 लहान मुले कोरोना बाधित आढळून आली. यातील सुमारे 9,882 मुले पाच वर्षांखालील आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 20 टक्के संख्या ही लहान मुलांची आहे. देशातील पाच राज्यांमध्ये एकूण 79 हजार 688 मुले कोरोनाबाधित आढळली आहेत. हे आकडे चिंतेत टाकणारे असून, आरोग्य यंत्रणेसह पालकांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे.