निवडणूक शपथपत्रामध्ये दोन गुन्ह्यांची माहिती लपविल्याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज, शनिवारी नागपूर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर झाले. या प्रकरणावर पुढील सुनावणी येत्या ६ मे रोजी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
२०१४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवली, असा आरोप ईडी प्रकरणातील आरोपी अॅड. सतीश उके यांनी केला आहे. या प्रकरणात फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयापुढे केली आहे.
१२५ अ लोकप्रतिनिधी कायद्यान्वये हा खटला दाखल करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर कलम ४२०, ४६७, ४६८ बदनामी, फसवणूक, कागदपत्रांमध्ये फेरफार करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जे त्यांनी २०१४ च्या निवडणुकीमध्ये शपथपत्र सादर करताना निवडणूक आयोगापासून लपविले होते. १९९९-२००० मध्ये फडणवीसांनी या प्रकरणात जामीन मिळविला होता. २०१९ च्या निवडणुकीत अर्ज भरताना त्यांनी या प्रकरणांची माहिती दिली नाही. उके यांनी या विषयावर जेएमएफसी न्यायालयात याचिका दाखल करून फडणवीस यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्याची विनंती केली होती. त्यामुळे या प्रकरणी नागपूर जिल्हा न्यायालयात देवेंद्र फडणवीस यांना आज १५ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीला उपस्थित राहावे लागले. आपली बाजू मांडताना फडणवीस म्हणाले की, माझ्यावरील आरोप राजकीय द्वेशातून करण्यात आले आहेत. त्यामुळे या आरोपातून मुक्तता करण्यात यावी. या प्रकरणावर ६ मे रोजी सुनावणी होणार आहे.
न्यायालयाला छावणीचे स्वरूप
सध्या नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आयोजित आहे. त्यामुळे राज्यातील मोठमोठे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते नागपुरात आहेत. आज शनिवारी दुपारी फडणवीस न्यायालयात हजर झाले, त्यावेळ न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात होता. त्यामुळे न्यायालयाला छावणीचे स्वरूप आले होते. तसेच मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्तेसुद्धा उपस्थित होते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता.