नागपूर- मुंबई समृद्धीमहामार्गाबाबत मोठी बातमी पुढे येत आहे. त्यानुसार २७ डिसेंबर ते २९ डिसेंबर दरम्यान या महामार्गावरील वेगवेगळ्या भागात विशिष्ट कामासाठी मेगाब्लॉक घेतल्या जाणार आहे. त्यामुळे येथील वाहतूक काही वेळ थांबवण्यात येणार आहे. या प्रकरणाबाबत आपण आणखी जाणून घेऊ या.
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (एच. टी. एम. एस.) अंतर्गत गॅन्ट्री बसविण्याचे काम अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे परिसरात करण्यात येणार आहे. हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत पाच टप्प्यांत केले जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत संबंधित वाहिनीवरील वाहतूक काही काळासाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.
प्रत्येक टप्प्यात गॅन्ट्री उभारणीचे काम सुरू असताना, त्या टप्प्यालगतच्या महामार्ग वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांपर्यंत थांबविली जाईल. काम पूर्ण होताच संबंधित वाहिनीवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे. एमएसआरडीसीच्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने ही गॅन्ट्री बसविण्यात येत आहे. या गॅन्ट्रीच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रण, वेग नियंत्रण, आपत्कालीन सूचना तसेच विविध तांत्रिक प्रणाली प्रभावीपणे राबविणे शक्य होणार आहे.
वाहतूक बंद ठेवण्याचे वेळापत्रक
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर २७ डिसेंबर रोजी साखळी क्रमांक १०४.०८० व १०५.०५० नगरगावंडी येथे मुंबईकडे जाणारी वाहिनी दुपारी २ ते ३ किंवा ३ ते ४ या वेळेत बंद राहील. २८ डिसेंबर रोजी साखळी क्रमांक १०५.०६५ नगरगावंडी येथे नागपूरकडे जाणारी वाहिनी दुपारी २ ते ३ किंवा ३ ते ४ या वेळेत बंद ठेवण्यात येईल.
२९ डिसेंबर रोजी साखळी क्रमांक १२०.३०० टिटवा येथे नागपूर वाहिनी सकाळी ११ ते १२ किंवा दुपारी १२ ते १, तसेच याच ठिकाणी मुंबई वाहिनी दुपारी ३ ते ४ किंवा ४ ते ५ वाजेपर्यंत वाहतुकीस बंद राहणार आहे. या कालावधीत समृद्धी महामार्गाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांनी प्रवासाचे योग्य नियोजन करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच महामार्गावरील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन एमएसआरडीसीकडून करण्यात आले आहे.
विश्वभारत News Website