माणिकगड डस्टच्या मुद्यावर आता “राकाँ” एक्शन मोडवर.
(३० मार्चपर्यंत नियंत्रण नाही तर सिमेंट वाहतूक रोखू.पत्रपरिषदेत माहिती.)

कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहराच्या मध्यभागी असलेली माणिकगड सिमेंट कंपनी (अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समूह)च्या डस्ट प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची बोंब सुरू आहे. विविध प्रकारच्या आजारांनी डोके वर काढले असून शहराच्या विविध भागातील घरांच्या छतांवर,वाहनांवर,झाडांवर तसेच इतर उपयोगात येणाऱ्या वस्तूंवर डस्टचे साम्राज्य पसरले आहे.डस्टच्या वर्षावमुळे उत्पन्नात घट होत असल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.अशाप्रकारे अनेक अनपेक्षित समस्या या कंपनीच्या डस्टमुळे निर्माण झाल्या आहे.ही बाब गंभीरतेने घेत आता कोरपना तालुका राष्ट्रवादी काँग्रेस “एक्शन मोडवर” असल्याचे चित्र असून येत्या ३० मार्चपर्यंत जर कंपनीने डस्ट प्रदूषण आटोक्यात आणले नाही तर माणिकगड सिमेंट कंपनीतून होणारी सिमेंटची वाहतूक पुर्णपणे रोखली जाईल अशी माहिती १४ मार्च रोजी गडचांदूर येथील राकाँ जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत राकाँतर्फे देण्यात आली आहे.
सदर पत्रपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजूरा विधानसभा अध्यक्ष अरूण निमजे,कोरपना तालुकाध्यक्ष तथा न.प.उपाध्यक्ष शरद जोगी, राकाँ जिल्हा सचिव प्रवीण काकडे,राकाँचे ज्येष्ठ नेते सैय्यद आबीद अली,राकाँ जिल्हा उपाध्यक्ष सुनील आरकीलवार,राकाँ तालुका सचिव प्रविण मेश्राम,तालुका उपाध्यक्ष करण सिंग,प्रविण कोल्हे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. दिलेल्या मुदतीत माणिकगड सिमेंट कंपनीने डस्ट प्रदूषणावर निमंत्रण आणले नाही तर कंपनीतून होणारी सिमेंटची वाहतूक रोखण्यात येईल त्याचप्रमाणे याकालावधित घरांच्या छतांवर जमा झालेला डस्ट गोळा करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांना भेट म्हणून पाठविण्यात येईल असे ही यावेळी उपस्थितांनी म्हटले आहे.आता याविषयी काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.