विश्व भारत ऑनलाईन :
कर्करोग म्हटलं की, पायाखालची जमीनच सरकते. हा रोग एकेकाळी वृद्धापकाळातला आजार मानला जात असे. मात्र सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्येही त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे.
पोट,आतड्यांचा कर्करोग तरुणाईत वाढतोय
कर्करोगाच्या विळख्यात तरुण/तरुणी जास्त प्रमाणात असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. 44 देशांमधील कर्करोगाच्या नोंदींच्या अभ्यासात हे आढळून आले आहे. आतड्यांसंबंधी आणि इतर 13 प्रकारचे कर्करोग वेगाने वाढत आहेत. यापैकी बहुतेक पचनसंस्थेवर परिणाम करतात. 50 वर्षांखालील लोकांमध्ये या आतडे प्रकारातील कर्करोग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. थायरॉईड कर्करोगासारख्या विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाची प्रकरणे तरुण प्रौढांमध्ये वाढत आहेत.
अभ्यासक काय म्हणतात?
रिव्ह्यूचे सह-लेखक हार्वर्ड टी.एच. चान पब्लिक स्कूलमधील पॅथॉलॉजीचे प्राध्यापक शुजी ओगिनो यांनी म्हटलं की, बहुतेक केसेस लठ्ठपणा, मधुमेह, धूम्रपान, अल्कोहोल, प्रदूषण, पाश्चात्य देशांमध्ये सामान्यतः सेवन केले जाणारे लाल मांस यांच्याशी संबंधित आहेत. कर्करोगाचे अनेक अज्ञात घटक देखील असून शकतात ज्यात खते किंवा अन्नामध्ये जोडलेली रसायने याचा समावेश असू शकतो. आम्हाला अद्याप याबद्दल माहिती नाही.
खते, रसायन कारणीभूत
14 पैकी 8 केसेस पोट आणि पचनसंस्थेशी संबंधित असल्याने खते आणि रसायनांचा याच्याशी संबंध असून शकतो असे ओगिनो यांना वाटते. जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथील डॉ. एलिझाबेथ प्लॅट्झ यांचा असा विश्वास आहे की, हे एक महत्त्वपूर्ण रिव्ह्यू आहे, ज्यात दिसून येते की,तरुण जास्त प्रमाणात कर्करोगाचे बळी पडत आहेत. लठ्ठपणाचे कारण दुर्मिळ होते, परंतु आज ते खूप सामान्य झाले आहे.
कर्करोगाचे कारणच सापडेना?
कर्करोग नेमका कशाने होतो, हे काही गोष्टी सोडल्या तर असे नेमके ठोस कारण अद्याप सापडलेले नाही. लाल मास, धूम्रपान किंवा जंक फूड ही प्राथमिक कारणे आहेत. पण, अजूनही अनेक कारणे अशी आहेत की, कर्करोग नेमका कशानी होतो, हे उघड झालेले नाही. तर काही ठिकाणी पेशीची लहान मोठी वाढ आणि त्यातील बदल सांगितला जातो. तरीही असे हे कारण ठोस नसल्याचे दिसते. पोटाशी संबंधित कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ओगिनोंच्या रिव्ह्यूमध्ये असे आढळून आले की युनायटेड स्टेट्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स आणि जपानमधील तरुणांमध्ये कोलोरेक्टल कर्करोग दरवर्षी सरासरी 2 टक्क्यांनी वाढतो आहे. ब्रिटनमध्ये, इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्समध्ये दरवर्षी तीन टक्के दराने वाढ झाली. हा आकडा मोठा वाटत नाही, पण दरवर्षी हा आकडा वाढत राहिला तर 10 किंवा 20 वर्षांत मोठा बदल होईल असे ओगिनो यांनी म्हटले.