मुंबई मंत्रालयातील एका कर्मचाऱ्याकडून लिपिकपदी नोकरी देण्याच्या आमिषाने प्रत्येकी ०६ ते १० लाख रुपये घेऊन फसवणूक सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या बोगस नोकर भरती रॅकेटच्या आमिषाला बळी पडलेले १० पीडित समोर आले आहेत. प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात महेंद्र सकपाळ, महादेव शिरवाळे, सचिन डोळस व नितीन कुंडलिक या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मालाडमधील रहिवासी सागर जाधव या २६ वर्षीय तरुणाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्याच्या वडिलांच्या मित्राकडून त्यांची आरोपी सकपाळ याच्यासोबत ओळख झाली. सकपाळने त्याच्या ओळखीचे वरिष्ठ अधिकारी नितीन साठे याच्या ओळखीने पैसे देऊन मंत्रालयात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले. यादव कुटुंबाने सुरुवातीला ३ जणांचे ९ लाख रुपये भरले.
आवश्यक कागदपत्रे घेऊन सर जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाली. नियुक्ती पत्रासाठी रीतसर पेपर काढलेले दाखवले गेले. मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागातील एका केबिनमध्ये मुलाखती पार पडल्या. लवकरच विभाग प्रमुखांची सही घेऊन रुजूपत्र, आय.डी. कार्ड आणि किट देण्यात येईल, असे सांगून मंत्रालयात बोलावून घेत उर्वरित ६ लाख रुपये घेण्यात आले. नंतर या आरोपींनी आणखी ०२ लाख उकळले.
पैसे भरूनही नोकरी मिळाली नसल्याने केलेल्या चौकशीमध्ये या टोळीने आणखीन काही जणांकडून नोकरीसाठी पैसे घेतल्याचे समोर आले. तरुणांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर हा बोगस नोकर भरतीचा भांडाफोड झाला. या प्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.