चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच अलीकडील घटना लक्षात घेता मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे.जिल्ह्यात २०३ वाघ आहेत. लवकरच जिल्ह्यातील ५ वाघ नवेगाव-नागझिराच्या जंगलात स्थलांतरित केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सह्याद्री, मेळघाट, संभाजीनगर येथे २५ वाघ स्थलांतरित केले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
सावली तालुक्यातील पेंढारी मक्ता येथे मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील संधी व उपक्रमांच्या माहितीसाठी आयोजित मत्स्य महोत्सवात ते बोलत हाेते. मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. दिवसागणिक वाघाच्या हल्ल्यात मानवाच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक झाले होते. तसेच जिल्ह्यात वाघाच्या संख्येतही मोठी झाली असून २०३ वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे. वाघाचे अधिवास क्षेत्र कमी पडत असल्यामुळे होणाऱ्या झुंजीत वाघाच्या मृत्यूच्या घटनादेखील घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील वाघाचे दोन टप्प्यात स्थलांतरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात गोंदियातील नवेगाव-बांध, नागझिरा अभयारण्यात ५ वाघ स्थलांतरित करण्यात येणार आहे. स्थलांतरणाची सर्व प्रक्रिया ही राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसार होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सह्याद्री, मेळघाट, संभाजीनगर या तीन ठिकाणी २५ वाघ स्थलांतरित केले जाणार आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
गावाकऱ्यांना लाभ
वाघाच्या स्थलांतरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलालगतच्या गावातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत मिळणार आहे.