राज्याला गारपिटीचा जबरदस्त तडाखा बसत आहे. सलग दोन दिवस सुरू गारपिटीमुळे राज्याच्या अनेक भागांतली पिकं मातीमोल झाली. मराठवाड्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला. अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात सहा तर विदर्भात एक बळी गेला. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातली रब्बी पिकं या गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं उध्वस्त झाली. त्यातच राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे रखडले.
लातूर
वादळी वाऱ्यासह गारपीट झालीय. आणि त्याचा फटका पिकांना बसलाय. ज्वारी, गहू हरभऱ्याला पावसाचा फटका बसला. लातूर तालुक्यातल्या भातांगळी गावात जोरदार गारपीट झाली. त्यामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत.
नाशिक
जिल्ह्यातील रब्बी पिकं आडवी
नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले.मनमाड परिसरातही पंधरा दिवसात तिसऱ्यांदा अवकाळी पावसाने हैदोस घातला. त्यामुळे रब्बी पिकं आडवी झालीयत. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. निफाड तालुक्यात वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झालीय. निफाड तालुक्यातील कुंभारी, पंचकेश्वर, वनसगाव, रानवड परिसरात संध्याकाळच्या सुमाराला 15 ते 20 मिनिटं वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाबरोबर गारपीटही झाली. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झालीय. गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने कांदा, गहू आणि द्राक्ष यासह शेती पिकांचे नुकसान झाले होतं. आता या पावसाने उरले सुरले कांदा, गहू आणि द्राक्षांचे पुन्हा मोठं नुकसान झालंय.
नांदेड
नांदेड जिल्ह्यात आजही अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. गुरुवारी मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान केले होते. त्यानंतर आज पुन्हा हिमायतनगर तालुक्यातील काही गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. एकंबा, शिरपल्ली, सिरंजनी, कौठा, शलोडा, बोरगडी, धानोरा गावांमध्ये गारपीट झाली. बोरांएवढ्या गारा कोसळत होत्या. या गारपिटीचा शेतकऱ्याला मोठा फटका बसलाय.
परभणी
जिल्ह्यातील विविध भागात गारपीट झाली. सेलू तालुक्यातल्या कुपटा शिवारात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. गंगाखेड तालुक्यातल्या सुपा गाव परिसरात जोरदार गारपीट झाली. यात कांदा, गहू, ज्वारी, आंबा आणि भाजीपाल्याचं नुकसान झालं. मानवत शहरातल्या काही भागातही गारा कोसळल्या. सलग दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस आणि गारपिटीने शेतकरी हवालदिल झालाय.
सोलापूर
सोलापुरात माळशिरस तालुक्यात जोरदार अवकाळी गारांचा पाऊस पडला. यामुळे मका, गहू, आंबा या पिकांना मोठा फटका बसला आहे. या भागात अशा पद्धतीने अवकाळी गारांचा पाऊस या आधी कधी पडला नव्हता. तर दुसरीकडे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, गादेगाव, टाकळी परिसरात मध्यम पाऊस झाला आहे.