गोमूत्रात १४ प्रकारचे हानीकारक जिवाणू असतात. थेट गोमूत्र प्राशन करणे मानवी आरोग्यास अपायकारक ठरू शकते, असा दावा बरेलीच्या पशुविज्ञान संस्थेतील संशोधकांनी केला आहे. हे संशोधन संस्थेला सादर केले असून, संकेतस्थळावरही प्रकाशित करण्यात आले आहे. या निष्कर्षांमुळे गोमूत्रावरून पुन्हा वाद होऊ शकतो.
भारतीय पशुसंशोधन संस्था (आयव्हीआरआय) ही देशातील पशूंबाबत संशोधन करणारी नामांकित संस्था आहे. येथील भोजराज सिंग यांच्यासह तीन ‘पीएचडी’च्या विद्यार्थ्यांनी हे संशोधन केले. ‘‘भारतात गोमूत्र पवित्र मानले गेले असले तरी थेट मानवी सेवनास ते योग्य किंवा सुरक्षित नाही. गाय, म्हैस, बैलांच्या मूत्रात बरेच हानिकारक जिवाणू असतात. हे जिवाणू मानवाच्या पोटात जाऊन विविध रोग, आजारांचे संक्रमण वाढवू शकतात’’, असे या संशोधनात नमूद आहे.
प्रक्रियायुक्त गोमूत्र जिवाणूरहित असल्याने त्याचा अपाय संभवत नाही, असे काही जाणकारांचे मत आहे. मात्र, यासंदर्भात आणखी संशोधन सुरू असून, त्याचे निष्कर्ष लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहेत.
हिंदू धर्मात गोमूत्र पवित्र मानले जाते. ते घरातील अंगणात शिंपडल्यास वातावरणातील घातक घटक नष्ट होतात, असे मानले जाते. तसेच घरी काही मंगल कार्य असल्यास गोमूत्र शिंपडण्याची प्रथा आहे.
म्हशीचे मूत्र जास्त प्रभावी
गायी, म्हैस आणि बैलांच्या मूत्र नमुन्यांची तपासणी केली असता गायींपेक्षा म्हैसवर्गीय जनावरांच्या मूत्रात जिवाणूविरुद्ध लढण्याची क्षमता, गुणधर्म जास्त आहेत. त्यामुळे प्रतिजैविक म्हणून म्हशीचे मूत्र जास्त प्रभावी असल्याचेही या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.