शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात दोन कार्यकारी अध्यक्षाची नियुक्ती केली.यात आधीपासूनच राष्ट्रीय स्तरावर काम करणारे प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर दिल्लीत आयोजित या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांनीच या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
पाण्याच्या बाटलीशी खेळताना दिसले अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे भाषण सुरू असताना अजित पवार मात्र, पाण्याच्या बाटलीशी खेळताना दिसले. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषणा केली, त्यावेळी अजित पवार यांच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव दिसून आले नाहीत. त्यामुळे अजित पवार नाराज आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
अजित पवारांनी प्रतिक्रिया का दिली नाही?
सुप्रिया सुळे यांची निवड झाल्यानंतर प्रसार माध्यमांनी अजित पवार यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजित पवार यांनी कोणतेच उत्तर दिले नाही. कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिय न देता अजित पवार कार्यक्रमातून निघून गेले. अजित पवार माध्यमांना प्रतिक्रिया देणे कधी टाळत नाही. मात्र, एवढ्या मोठ्या निर्णयावर अजित पवार आणि प्रतिक्रिया देणे का टाळले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शरद पवारांच्या राजीनाम्याचे केले होते समर्थन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिला त्यावेळी एकमेव अजित पवार यांनी त्या निर्णयाचे समर्थन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते जेव्हा शरद पवार यांच्या राजीनामाला विरोध करत होते, त्यावेळी अजित पवार यांनी मात्र कार्यकर्तांना तुम्हाला हा निर्णय का नको, असा प्रश्न उपस्थित करत होते. यावेळी मात्र, शरद पवार यांनी एवढी मोठी घोषणा केल्यावर अजित पवार हे शांत दिसून आले. तसेच माध्यमांशी न बोलता त्यांनी कार्यक्रमातून निघून जाणे पसंत केले.
अजित पवार यांच्याकडे कोणती जबाबदारी?
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाब या तीन राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी निवडणूका सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली लढल्या जाणार आहेत. अशा परिस्थितीत अजित पवार यांच्याकडे कोणती जबाबदारी देण्यात येईल? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पक्षाचा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आधीच जयंत पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवारांनी केले ट्विट
दिल्लीतील कार्यक्रमातून निघून गेल्यानंतर अजित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यात अजित पवार म्हणाले की, ‘शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे.’